धर्मराजाचा न्याय आणि एका न्यायाधीशाची निष्ठा
न्यूज 18 हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, सुमारे २०० वर्षांपूर्वी त्रावणकोर रियासतीवर कार्तिका तिरुनाल राम वर्मा यांचे राज्य होते, ज्यांना 'धर्मराजा' म्हणून ओळखले जात असे. ते कायद्याचे पालन आणि न्यायव्यवस्थेसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या दरबारात गोविंद पिल्लई नावाचे एक निष्ठावान न्यायाधीश होते. ते संस्कृतचे विद्वान होते आणि राजाप्रमाणेच ते कधीही कायदा आणि न्यायाच्या मार्गापासून ढळले नाहीत. त्यांची हीच निष्ठा एका दुर्दैवी घटनेला कारणीभूत ठरली.
advertisement
निष्पाप भाच्याला दिली फाशी
एकदा गोविंद पिल्लई यांच्या भाच्यावर एक गंभीर आरोप लागला आणि योगायोगाने हे प्रकरण याच न्यायाधीशांच्या कोर्टात आलं. पुरावे आणि युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायाधीशांनी आपल्या भाच्याला दोषी मानून फाशीची शिक्षा सुनावली. मात्र, फाशी दिल्यानंतर काही काळानं गोविंद पिल्लई यांना मोठा धक्का बसला. त्यांना कळून चुकले की आपला निर्णय चुकीचा होता आणि आपला भाचा निर्दोष होता. स्वतःच्या चुकीच्या निर्णयामुळे निर्दोष भाच्याला मृत्यू दिल्याचा अपराधभाव ते सहन करू शकले नाहीत.
या भयंकर पश्चात्तापातून बाहेर पडण्यासाठी, न्यायाधीश पिल्लई यांनी राजाकडे स्वतःला शिक्षा देण्याची मागणी केली. राजाने सुरुवातीला नकार दिला, पण नंतर ते तयार झाले आणि शिक्षा सुनावण्याचे कामही त्यांनी गोविंद पिल्लई यांच्याकडेच सोपवलं. गोविंद पिल्लई यांनी स्वतःला सुनावलेली शिक्षा अत्यंत कठोर आणि भयावह होती. त्यांचे दोन्ही पाय कापून त्यांना सार्वजनिकरित्या फाशीवर लटकावले जावे आणि त्यांचा मृतदेह तीन दिवस त्याच ठिकाणी टांगून ठेवला जावा. या आदेशाची त्वरित अंमलबजावणी झाली.
अखेर न्यायदेवतेला मंदिरात स्थान
गोविंद पिल्लई यांच्या मृत्यूनंतर, परिसरात काही अशुभ घटना घडू लागल्या. तेव्हा एका ज्योतिषाने सल्ला दिला की, न्यायाधीश आणि त्यांच्या भाच्याच्या आत्म्यांना मोक्ष मिळालेला नाही. न्यायाधीशांच्या आत्म्याला चेरुवल्लीच्या पय्यम्बल्ली इथे त्यांच्या वडिलोपार्जित घरी समाधी देण्यात आली. भाच्याच्या आत्म्याला मात्र सुमारे ५० किमी दूर तिरुवल्ला येथील एका मंदिरात स्थान मिळाले. नंतर चेरुवल्ली देवी मंदिरात जजयम्मावनची मूर्ती स्थापित करण्यात आली. १९७८ मध्ये त्यांच्या वंशजांनी मुख्य देवीच्या मंदिराबाहेर 'जज अंकल'साठी एका वेगळ्या गर्भगृहाची स्थापना केली. हे मंदिर रोज केवळ ४५ मिनिटांसाठीच उघडते आणि रात्री ८ च्या सुमारास पूजा सुरू होते.
