नवी दिल्ली: दिल्लीत नुकताच राहायला गेलेल्या एका तरुणाला डेटिंग अॅपवर ओळख झालेल्या मुलीमुळे मोठा धक्का बसला आहे. एका भेटीनंतर त्याला तब्बल 18 हजार रुपयांचे बिल भरावे लागले आणि ही फसवणूकच होती का, असा प्रश्न तो आता स्वतःलाच विचारतो आहे. या अनुभवाची सविस्तर माहिती त्याने Reddit वर शेअर केल्यानंतर हा प्रकार चर्चेत आला आहे.
advertisement
आपल्या पोस्टमध्ये त्या तरुणाने सांगितले की तो दिल्लीमध्ये नवीन असल्यामुळे एकटेपणा जाणवत होता. “माझी नुकतीच दिल्लीमध्ये बदली झाली आहे. इथे माझा फारसा कोणी ओळखीचा नाही. त्यामुळे डेटिंग अॅपवर एका मुलीशी मॅच झाल्यावर गप्पा सुरू झाल्या. सुरुवातीलाच मी तिला स्पष्ट सांगितले होते की मला रिलेशनशिप नको आहे. फक्त भेटून बोलायचे होते, कारण मी नवीन आहे आणि थोडा एकटा वाटत होता,” असे त्याने लिहिले.
दोघांनी शहरातील एका कॅफे किंवा रेस्टॉरंटमध्ये भेटायचे ठरवले. मात्र तो तिथे पोहोचल्यावर जागा त्याला फारशी आवडली नाही. तरीही भेट रद्द न करता तो तिथे थांबला.
तिने रेड वाईनचा एक ग्लास ऑर्डर केला. मी दारू पीत नाही, त्यामुळे काहीच मागवले नाही. थोड्याच वेळात बिल आले आणि ते पाहून मला अक्षरशः धक्का बसला. बिल तब्बल 18 हजार रुपयांचे होते, असे त्याने पोस्टमध्ये नमूद केले.
‘खूप अस्वस्थ आणि तणावात गेलो’
त्या तरुणाने पुढे लिहिले की ही भेट साधी-सोपी आणि कमी खर्चाची असेल, असे त्याला वाटले होते. मात्र अचानक आलेल्या प्रचंड बिलामुळे तो पूर्णपणे गोंधळून गेला. “माझा महिन्याचा पगार फक्त 25 हजार रुपये आहे. त्यामुळे ही रक्कम माझ्यासाठी खूप मोठी आहे. शेवटी मी पैसे भरले, पण मनात प्रचंड अस्वस्थता आणि तणाव होता. अजूनही एकच विचार सतत डोक्यात आहे. दिल्लीमध्ये हे सामान्य आहे का? ही एखादी फसवणूक होती का? आणि माझ्याकडे तेवढे पैसेच नसते, तर मी काय केले असते?” असे त्याने लिहिले.
आपली पोस्ट संपवताना त्याने स्पष्ट केले की कोणावर प्रभाव पाडण्याचा किंवा दिखावा करण्याचा त्याचा अजिबात उद्देश नव्हता. मात्र या घटनेनंतर पुन्हा कोणाला भेटण्याचीही आता भीती वाटत असल्याचे त्याने म्हटले.
हा तर नेहमीचा स्कॅम आहे
या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने लिहिले, भाऊ, या मुली बार किंवा पबकडून हायर केलेल्या असतात. ही एक ठरलेली फसवणूक आहे. थोडा अनुभव आणि अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवायला हवा. मलाही अशा दोन जणी भेटल्या होत्या, ज्या संशयास्पद वाटल्यामुळे भेटायलाच आल्या नाहीत.
दुसऱ्याने थेट लिहिले, तिने तुला स्कॅम केलं आहे. युरोपमध्येही हे खूप कॉमन आहे. ती बारसोबत मिळून लोकांना फसवते. तू बिल भरायलाच नको होतंस.
अनेकांनी पुढच्या वेळी अधिक सावध राहण्याचा सल्ला दिला. काहींनी तर अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवण्याचा आग्रह धरला.
महत्त्वाचे म्हणजे हा काही पहिलाच प्रकार नाही. याआधीही अनेकदा डेटिंग अॅपच्या माध्यमातून पुरुषांना ठरावीक बार किंवा कॅफेमध्ये बोलावले जाते आणि नंतर अवाजवी, फुगवलेली बिले दिली जातात, असे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे अशा भेटी ठरवताना जागा, खर्च आणि परिस्थिती याबाबत अधिक सतर्क राहणे गरजेचे असल्याचेच या चर्चेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.
