TRENDING:

वडील गेले, जमिनीवर टाकलेलं अन्न खायची आली वेळ, मराठी अभिनेत्रीचा नातेवाईकांनीच केला छळ

Last Updated:
Marathi Serial Actress : अभिनेत्रीने तिच्या खडतर बालपणाची कहाणी सांगितली. वडील गेल्यावर आईने बूट पॉलिश, दागिन्यांची दुरुस्ती करून कुटुंब चालवलं.
advertisement
1/9
वडील गेले, जमिनीवर टाकलेलं अन्न खायची आली वेळ, अभिनेत्रीचा नातेवाईकांनीच केला छळ
मुंबई: मराठी मनोरंजन विश्वात स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी अनेकजण मोठ्या संघर्षातून येतात. नाटक, छोट्या भूमिका करत ते आपली ओळख बनवतात. सध्या मराठी टेलिव्हिजनवर आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या एका अभिनेत्रीने तिच्या लहानपणीच्या आठवणी, आणि हलाखीच्या दिवसांचा उलगडा केला आहे. ही अभिनेत्री दुसरी कुणी नसून कश्मिरा कुलकर्णी आहे, जिने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत आपलं खडतर बालपण सांगितलं.
advertisement
2/9
स्टार प्रवाहवरील 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणारी कश्मिरा तिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने वडील गेल्यावर कुटुंबावर ओढवलेली बिकट परिस्थिती, शिक्षणासाठी केलेले प्रयत्न आणि या दरम्यान आईला दिलेली साथ यावर भाष्य केलं.
advertisement
3/9
कश्मिरा म्हणाली, "मी अवघी चार वर्षांची होते, तेव्हा माझे वडील वारले. वडील गेले असले तरी नातेवाईकांमध्ये त्यांच्याविषयी चर्चा व्हायच्या. मला त्यांच्याविषयीच्या फार कमी गोष्टी आठवतात. त्यांची शुगर वाढल्याने ते कोमात गेले होते. त्यांना देहदान करायचं होतं, पण शुगर वाढल्यामुळे ते शक्य झालं नाही. त्यामुळे त्यांचे नेत्रदान करण्यात आलं. ज्या काकांना ते नेत्रदान करण्यात आलं होतं, त्यांना आम्ही भेटलो होतो. कायद्याने ते समजायला नको, पण एकाच गावात असल्यामुळे कळतं. ज्या काकांना डोळे बसवले होते, ते आता जग पाहू शकत होते. वडील गेल्यावर लगेचच माझ्या मोठ्या ताईचं लग्न झालं, त्यामुळे मी, माझी लहान बहीण आणि आई घरी असायचो. मी दारात काठी घेऊन बसायचे की कुणीही आमच्या आईकडे वाकड्या नजरेने बघायला नको."
advertisement
4/9
कश्मिराने आपल्या आईच्या संघर्षाची कहाणीही सांगितली. "माझ्या आईने रस्त्यावरच्या हातगाडीवर बूट पॉलिश करून दिले आहेत. एका बाजूला सोन्या-चांदीच्या दागिन्यांची दुरुस्ती करणं, लहान मुलांचे कान टोचून देणं ही कामं ती करायची. दागिन्यांना पॉलिश करून देणं हे काम असायचं. त्यानंतर संध्याकाळी सोन्या-चांदीचे दागिने बनवायला यायचे, मग ते करायचो. माझ्या आईने खूप मेहनत घेतली आहे. परिस्थितीनेच तिला सक्षम बनवलं. तिच्यामुळेच मी पण कणखर बनले."
advertisement
5/9
शिक्षणाच्या खर्चासाठीही त्यांना संघर्ष करावा लागला. "नाक-कान टोचून फक्त दहा-पंधरा रुपये मिळायचे. अशी आमची अवस्था होती. मग मुलींचं शिक्षण सरकारी शाळेतून झालं, कारण तिथे फी माफ असते. पण शाळेचा ड्रेस, वह्या-पुस्तकांचा खर्च असतोच. मग सगळ्या सोनारांच्या दुकानात जाऊन वर्गणी गोळा करायची. त्यातून जे पैसे यायचे, त्यातून ड्रेस घ्यायचो. पुस्तकं तर शाळेत मिळायची, पण असं होतं की चारशे पानी दोनच वह्या घ्यायच्या आणि त्यातच सगळ्या विषयांचं लिहायचं. बऱ्याचदा वह्याही नसायच्या, मग फळ्यावर लिहिलेलं वाचायचं आणि मग वर्षभरानंतर परीक्षा द्यायची."
advertisement
6/9
कश्मिरा पुढे म्हणाली, "आम्ही खूप बघितलं आहे. म्हणजे नंतर जे घरात नातेवाईक आले, ते मला, आईला किचनमध्ये जाऊ द्यायचे नाहीत. उपवास वगैरे पहिल्यापासून घरी असायचे. त्यामुळे खिचडी वगैरे बनवून ठेवली, तर ते काय करायचे की खिचडी अशी ताटातून खाली जमिनीवर टाकायचे आणि केरसुणीने बाजूला करून द्यायचे आणि बोलायचे आता खा तू. इतकी सगळी परिस्थिती बघितली आहे ना की वाटायचं की आपल्यासोबतच का होतं? हा प्रश्न सतत डोक्यात असायचा."
advertisement
7/9
जेवणासाठीही त्यांना अनेकदा तरसावं लागलं. "हॉटेलमध्ये शिल्लक राहिलेलं जेवण डबे भरून तिथे काम करणाऱ्या लोकांना दिलं जातं. तर तिथे काम करणाऱ्या एक मावशी होत्या. त्या आईला तो डबा द्यायच्या. पंधरा रुपये एक डबा तो होता, त्यामुळे एक दिवस आड तो डबा यायचा, म्हणजे एक दिवस आड असं व्यवस्थित जेवण मिळायचं. पण दुसऱ्या दिवशी जेवण असेलच असं नाही."
advertisement
8/9
"अगदी आतले कपडेही आम्ही जुने कुणीतरी दिलेले वापरायचो. म्हणजे शेजारच्या कोणत्या मुलींचे वापरून झाले की कपडे आम्हाला मिळतील, याची वाट बघायचो. अगदी कॉलेज होईपर्यंत असं केलं आहे. दिवाळीत जो शनिवारचा बाजार लागतो, त्यात जुने कपडे पुन्हा 'डाय' करून विकण्यासाठी ठेवलेले असतात. त्यातला एखादा ड्रेस दिवाळीला घ्यायचो असंही केलेलं आहे," असं कश्मिराने सांगितलं.
advertisement
9/9
कश्मिरा सध्या मालिकांमध्ये काम करण्याव्यतिरिक्त गोरगरिबांसाठी एक ट्रस्ट चालवते. याशिवाय 'सुकन्या गृहउद्योग' या नावाने तिचा बिझनेसही आहे, ज्यातून ती गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून देते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
वडील गेले, जमिनीवर टाकलेलं अन्न खायची आली वेळ, मराठी अभिनेत्रीचा नातेवाईकांनीच केला छळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल