पुणे : वातावरणात उकाडा कायम असला तरी आता बऱ्यापैकी सर्व जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावलीये. परंतु हवा तसा पाऊस पडत नसला तरी पावसामुळे ठिकठिकाणी नुकसान झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. भोर-महाड राष्ट्रीय महामार्गावरील पुण्याकडे येण्यासाठी वापरला जाणारा रस्ता दरड कोसळून खचलाय. 19 जून रोजी झालेल्या जोरदार पावसात हे नुकसान झालं. त्यामुळे हा रस्ता आता अरुंद झाला असून वाहतुकीसाठी धोकादायक ठरू शकतो. म्हणून भोर-महाड मार्गावरील वरंधा घाट रस्ता जवळपास 2 महिने अवजड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
advertisement
वरंधा घाट भागात वाघजाई मंदिराजवळ मुसळधार पाऊस झाल्यानं दरड कोसळून रस्ता खचला. आधीच हा घाट नागमोडी वळणाचा आहे, त्यात दरड खचल्यामुळे तो अरुंद झालाय. खचलेल्या भागाची पाहणी होणं आवश्यक आहे. एका बाजूला ही पाहणी होत असताना दुसऱ्या बाजूला असलेल्या प्रचंड उंच कड्यावरून अचानक डोंगरावरील दरड खाली कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा : Weather update : पुढील 48 तास महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस, या भागांसाठी IMD कडून धोक्याचा अलर्ट
या घाटात यापूर्वी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दरड कोसळणं, झाड पडणं, रस्ता खचणं, माती वाहून जाणं अशा दुर्घटना घडून जीवितहानी झालेली आहे. त्यामुळे आता पावसाची परिस्थिती पाहता या भागातील डोंगररांगांमधून वाहणाऱ्या पाण्यासोबतच दरड, डोंगरावरील झाडं महामार्गावर येण्याची शक्यता आहे. म्हणून वरंधा घाटातून प्रवास करणाऱ्या तसंच मालाची ने-आण करणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी आणि कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी भोर हद्दीतील भोर-महाड हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पुढील 2 महिने बंद करण्याची विनंती भोरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी केली होती.
त्यानुसार, भोर-महाड या मार्गावरील वरंधा घाट रस्ता दि. 26 जून ते दि. 31 ऑगस्ट या कालावधीत अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला आहे. दरम्यान, या कालावधीत भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून अतिवृष्टीचा रेड किंवा ऑरेंज अलर्ट दिला नसल्यास घाट रस्ता केवळ हलक्या वाहनांसाठी सुरू राहील, असे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी काढले आहेत.