कुंभारवाड्यात विविध आकारांचे रेडिमेड किल्ले विक्रीसाठी उपलब्ध असून त्यासोबतच शिवाजी महाराज, मावळे, सैनिक, गवळणी, प्राणी, वारकरी, शेतकरी अशा पारंपरिक विषयांवर आधारित विविध मूर्ती आणि चित्रांची मोठी मागणी दिसून येत आहे. त्यासोबतच छोटा भीम, चुटकी, डोरेमॉन, मोटू-पतलू, पैलवान यांसारख्या कार्टून पात्रांची चित्रेही यंदा विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. मुलांमध्ये या कार्टून पात्रांची मोठी क्रेझ असल्याने या चित्रांना पालक आणि लहान मुले दोघांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.
advertisement
विक्रेते शशिकांत काटकर यांनी सांगितले की, समर्थ कृपा या नावाने आम्ही गेली 35 वर्षे हा व्यवसाय करत आहोत. दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही विविध किल्ल्यावरील सजावटीची चित्रे बाजारात आणली आहेत. यंदा विशेष म्हणजे 32 प्रकारची नव्या धाटणीची चित्रे आणि 40 प्रकारचे मावळे उपलब्ध आहेत. एका डझन मावळ्यांची किंमत सध्या 250 रुपये असून छोटे चित्र एक 25 रुपयांपासून विक्रीस उपलब्ध आहे. या चित्रांमध्ये पारंपरिक आणि आधुनिक यांचा सुंदर संगम दिसतो. स्वयंपाक करणारी बाई, भांडी घासणारी बाई, जात्यावर दळण दळणारी स्त्री, विहिरीवर पाणी भरत असलेली बाई, बैलगाडी, गवळणी, ढोलकी वाजवणारे कलाकार, बांगड्या विक्रेते, भाजी विक्रेते, टोपली विणणारे कारागीर, अशा ग्रामीण जीवनाचे वास्तव दर्शन घडवणाऱ्या मूर्ती खूप लोकप्रिय ठरत आहेत.
त्याचबरोबर मुलांना भावणाऱ्या कार्टून पात्रांमुळे या सजावटींना वेगळं आकर्षण प्राप्त झालं आहे. कुंभारवाडा परिसरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. किल्ला सजवण्यासाठी लागणारे रेडिमेड POPचे घर, झाड, विहीर, गुढी, तुळशी वृंदावन अशा वस्तूंनाही भरपूर मागणी आहे. काही ग्राहक स्वतःचे डिझाइन घेऊनही विक्रेत्यांकडे येतात. किल्ल्याच्या सजावटीत परंपरेसोबत आधुनिकतेचं मिश्रण पाहायला आहे. दिवाळीतील फटाके, दिवे, कंदील, पणत्या यांसोबत किल्ल्यांची आणि त्यावरील सजावटींची परंपरा आजही टिकून आहे. या माध्यमातून केवळ बालकांना सर्जनशीलतेची प्रेरणा मिळत नाही, तर शिवरायांचा पराक्रम आणि इतिहासही नव्या पिढीपर्यंत पोहोचवला जातो. त्यामुळे दरवर्षी या किल्ल्यांची मागणी वाढतच चालली आहे.
विक्रेते सांगतात की, यंदा कार्टून पात्रांच्या चित्रांना अपेक्षेपेक्षा जास्त मागणी आहे. मुले आणि पालक दोघेही आपल्या आवडीप्रमाणे चित्रांची निवड करत आहेत.पुण्यातील कुंभारवाडा परिसर या दिवसांत रंग, उत्साह आणि कलात्मकतेच्या संगमाने उजळून निघाला आहे.