या प्रात्यक्षिकात लाठी-काठी, दांडपट्टा, तलवारबाजी, भाला चालविण्याची कला अशा पारंपरिक शस्त्रकलेचे प्रदर्शन केले जाते. ही कला केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शौर्य, शिस्त आणि रणनीतीचे प्रतीक मानली जाते.
गेली 14 वर्षे आम्ही भाऊसाहेब रंगारी गणपतीसमोर मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करत आहोत. ही पूर्वीपासून चालत आलेली आपली परंपरा आहे आणि परदेशातील नागरिकांनाही ही कला पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं संस्थेचे अध्यक्ष विजय आयवळे यांनी सांगितले.
advertisement
Mumbai Ganeshotsav 2025 : गणपतीच्या धामधुमीत अपघाताचा धोका; तब्बल इकते पूल जीर्ण; BMC ने दिली माहिती
त्यांनी पुढे सांगितले की, वर्षभर सराव सुरू असतो, मात्र गणेशोत्सवाच्या दोन महिने आधी खेळाडू अधिक जोमाने तयारी करतात. या खेळात 60 टक्के मुलींचा सहभाग आहे, तर एकूण 150 युवक-युवती हे प्रात्यक्षिक सादर करतात. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे इटलीतील महिला ऍनाया हिचा सहभाग. गेल्या तीन वर्षांपासून ती पुण्यात गणेशोत्सवाच्या निमित्ताने येते आणि या खेळात भाग घेते.
ऍनाया म्हणाली,गणेशोत्सवासाठी पुण्यात येणे हा माझ्यासाठी एक अनोखा अनुभव आहे. येथे येऊन मी श्री शिवाजीराजे मर्दानी आखाड्याच्या माध्यमातून पारंपरिक शस्त्रकला शिकले. हे सगळे पाहून खूप छान वाटते.
विजय आयवळे यांनी सांगितले की, संस्थेच्या प्रयत्नांमुळे ही कला केवळ महाराष्ट्रातच नाही तर इटली, जर्मनी, स्पेनसारख्या देशांमध्येही पोहोचली आहे. परदेशातील लोकांना मराठी संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी संस्था विशेष प्रयत्न करते.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरांचा संगम आहे. या परंपरेचा वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हे मर्दानी आखाड्याचे उद्दिष्ट आहे. लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सर्वांमध्ये शिस्त, धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हे प्रशिक्षण दिले जाते. भाऊसाहेब रंगारी गणपतीसमोर होणारे हे मर्दानी खेळ केवळ पुणेकरांसाठीच नव्हे तर देश-विदेशातून आलेल्या पर्यटकांसाठीही मोठे आकर्षण आहे.