चिमुकलीने साधलं मोठं यश
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही अवकाश संशोधनाची ओळख व्हावी तसेच विज्ञानातील आवड वाढावी या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेने एक उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा आणि भारतातील इस्रोला भेट देण्याची संधी दिली जाणार आहे. त्यासाठी घेतलेल्या निवड प्रक्रियेत भोर तालुक्यातील 12 वर्षीय अदिती पार्ठेची निवड झाली आहे.
advertisement
अदिती ही निगुडघर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी विद्यार्थिनी असून तिचे वडील मार्केट यार्डात हमालीचे काम करतात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही अदितीने मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले आहे.
दररोज सकाळी साडेतीन किलोमीटर अंतर पायी चालत शाळेत जाणारी अदिती सायंकाळी पुन्हा तासभर पायी चालत घरी येते. घरात स्मार्टफोन नाही, इंटरनेटचा वापर मर्यादित आहे, तरीही ती अभ्यासात, क्रीडेत, वक्तृत्व आणि नृत्यातही उत्तम आहे. भोर तालुक्यातील मावशीच्या घरी राहून ती शिक्षण घेत आहे. मुख्याध्यापकांनी नासा दौऱ्यासाठी तिची निवड झाल्याची बातमी दिली तेव्हा तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ही बातमी ऐकल्यावर तिच्या मावशी मंगल कंक म्हणाल्या, आमच्यापैकी कुणीही विमान पाहिलेलं नाही आणि आता आमची अदिती थेट अमेरिकेला जाणार आहे. आमच्या गावासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.
अदितीच अशी झाली निवड
अदितीची निवड कशी झाली, याविषयी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील सांगतात, जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर अनुभवाची संधी मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचा विकास करण्यासाठी आम्ही नासा आणि इस्रो भेटीचा कार्यक्रम आखला. त्यामुळे विद्यार्थ्यांना अवकाशशास्त्र, खगोलशास्त्र आणि विज्ञान शाखेत रस निर्माण होईल.
या उपक्रमासाठी आयुका (आंतरविद्यापीठीय खगोल आणि खगोलभौतिकी केंद्र) यांच्या सहकार्याने तीन टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात आली. पुणे जिल्ह्यातील तब्बल 75 झेडपी शाळांमधील 13,671 विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले. पहिल्या टप्प्यातील 10 टक्के गुणवंत विद्यार्थ्यांची दुसऱ्या टप्प्यासाठी निवड झाली. अखेरीस 25 विद्यार्थ्यांची निवड अमेरिकेतील नासा दौऱ्यासाठी आणि 50 विद्यार्थ्यांची इस्रो भेटीसाठी करण्यात आली.
नासा दौऱ्यात विद्यार्थ्यांसोबत तीन जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, आयुकाचे दोन प्रतिनिधी आणि एक वैद्यकीय अधिकारी सहभागी होणार आहेत. या उपक्रमासाठी जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजन समितीकडून तब्बल 2.2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
स्थानिक माध्यमांमधून अदितीच्या यशाची बातमी समजताच तिच्या शाळेने तिला एक सायकल आणि नवीन शालेय बॅग भेट दिली. तिच्या शिक्षिका वर्षा कुठवाड यांनी सांगितले, अदिती अतिशय मेहनती आणि आत्मविश्वासू आहे. तिच्यात काहीतरी वेगळेपण आहे. ती प्रत्येक स्पर्धेत सहभाग घेते आणि नेहमीच काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करते.”
अदितीच्या या यशामुळे तिच्या कुटुंबासोबतच संपूर्ण गावात आणि शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. छोट्याशा गावातील एका मुलीने अमेरिकेतील नासा संस्थेपर्यंत पोहोचून दाखवलेली कामगिरी ही केवळ तिच्या नव्हे, तर ग्रामीण भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याची प्रेरणादायी कथा ठरली आहे.