पुणे: खंडेनवमी म्हणजे शक्तिमातेचे पूजन सामर्थ्य प्राप्त व्हावे, संकटावर मात व्हावी, सौख्य-समाधान प्राप्त व्हावे, हा या पूजनामधील हेतू असतो. यादिवशी शस्त्रास्त्रांची आकर्षक मांडणी आणि सजावट करून विधिवत पूजन करण्यात येते. पुण्यातील भोर तालुक्यातील भुतोंडे येथील किल्ले राजगडाच्या पायथ्याशी सरनोबत येसाजी कंक यांचा वाडा आहे. कंक वाड्यात खंडेनवमीला कंक घराण्यातील पराक्रमी वीरांच्या शस्त्रांचं पूजन केलं जातं. सालाबादप्रमाणे यंदाही येसाजी कंक यांच्या वंशजांच्या हस्ते शस्त्रपूजन झाले.
advertisement
यावेळी ढाल, तलवार, पट्टा, विटा, गुर्ज, कट्यार, फरी गदका, लाठी-बोथाटी शस्त्रे मांडली होती. महाराष्ट्रात लष्करी परंपरा असलेल्या राज्यात मराठ्यांना तलवार ही अत्यंत प्रिय होती. त्यामुळे खंडेनवमी आधी आपली सारी हत्यारे घासून पुसून लख्ख करण्याकडे कल असायचा. तसेच त्याची मनोभावे पूजा केली जायची. अगदी पूर्वापार चालत आलेली ही परंपरा आजही अगदी तशीच आहे.
शिवरायांशी एकनिष्ठ कंक घराणं
राजगड जवळील भुतोंडे गावातील शूर मराठा अशी येसाजी कंक यांची ओळख होती. अगदी लहानपणापासूनच शिवाजी महाराजांसोबत कंक घराणं होतं. त्यांनी मुघल आणि आदिलशाही आक्रमकांविरुद्ध शिवाजी महाराजांचा 35 वर्षांचा युद्धाचा संपूर्ण काळ पाहिला होता. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर येसाजी कंक यांनी संभाजी महाराजांना देखील साथ दिली, अशा नोंदी इतिहासात आढळून येतात. कंक घराण्यातील सर्व शस्त्रांचे पूजन दरवर्षी खंडेनवमीला केले जातं, अशी माहिती येसाजी कंक यांचे वंशज सिद्धार्थ कंक दिली.
वारसांनी जपलीये परंपरा
दरम्यान, येसाजी कंकांचे 12 वे वंशज रामभाऊ कंक हे मावळ व वेळवंड खोऱ्यातील एक प्रभावशाली नेतृत्व होते. ते पंचायत समिती भोरचे सभापती होते. तसेच आप्पांचे पुत्र व येसाजी कंक यांचे 13 वे वंशज शशिकांत कंक, संजय कंक व राजेंद्र कंक आणि काका कंकांचे पुत्र शिवाजी कंक हे सुद्धा कंक घराण्याचे नाव व परंपरा आजही जपत आहेत. आपल्या लढाऊ, शौर्यशाली परंपरेचे स्मरण करून देणारी ही खंडेनवमी असून या निमित्ताने अभिमानास्पद पूर्वपरंपरेचे स्मरण होते.