डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आयुष्यभर अंधश्रद्धेविरोधात लढा दिला. त्यांच्याच विचारांना पुढे नेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून काही ऑनलाइन कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. या कोर्सेसमुळे भोंदुगिरी कशी ओळखायची, कोणत्या पद्धती वापरल्या जातात याची माहिती सामान्य नागरिकांना मिळणार आहे. यामध्ये सहा कोर्सेस उपलब्ध असून, त्यांचा अभ्यास केल्यानंतर कशाप्रकारे फसवणूक केली जाते हे समजण्यास मदत होणार आहे.
advertisement
एका अपघातामुळे त्या कुटुंबाच्या आयुष्यात परतला 'आनंद'; छ. संभाजीनगरमधील अंगावर काटा आणणारी घटना
या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुरुवातीला सहा कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, अंगात येणे, भुताने झपाटणे, भ्रामक वास्तुशास्त्र, छद्म विज्ञान आणि व्यसनमुक्ती अशा विषयांचा समावेश आहे. पुढील टप्प्यात फलज्योतिषातील गैरसमज आणि मानसिक आरोग्य यांसारखे आणखी काही महत्त्वाचे कोर्सेस वाढवले जाणार आहेत.
13 वर्षांवरील कोणीही हे कोर्सेस करू शकतो. ऑनलाइन परीक्षा यशस्वीरीत्या दिल्यानंतर प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांच्या सहीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. परीक्षेत केवळ माहितीची उजळणी नाही, तर आकलन तपासणारे प्रश्न विचारले जातील. अभ्यासक्रमासाठी www.anisvidya.org.in या वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल. विशेष म्हणजे सर्व कोर्सेस आणि परीक्षा पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आल्या आहेत.





