संबंधित पोलीस कर्मचारी रविवारी आपली ड्युटी झाल्यानंतर रात्री उशिरा घरी जात होते. यावेळी कारमधून आलेल्या चार जणांनी त्यांना बेदम मारहाण केली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पोलीस कर्मचारी रस्त्याच्या बाजुला लघुशंका करण्यासाठी उभे होते. याच वेळी त्यांच्यावर हल्ला झाला. पुण्यात आधीच कोमकर हत्याप्रकरण, आणि घायवळ टोळीचा उच्छाद या दोन्ही घटना ताज्या असताना आता पोलीस कर्मचाऱ्यालाच टार्गेट केल्याने शहरात सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
advertisement
प्रवीण रमेश डिंबळे असं मारहाण झालेल्या पोलिसाचं नाव आहे. ते भारती विद्यापीठ वाहतूक विभागात पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहेत. रविवारी रात्री ते ड्यूटीवरून आपल्या घरी परत जात होते. घरी जात असताना ते उंड्री पिसोळी जवळील एका फर्निचर दुकानाच्या बाजुला लघुशंकेसाठी थांबले. यावेळी एका चार चाकी वाहनातून आलेल्या चार इसमांनी त्यांना बेदम मारहाण केली.
ही मारहाण फर्निचरच्या दुकानाजवळ लघुशंका केल्यामुळे झाली की यामागे वेगळं काही कारण आहे? याची माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना देण्यात आली आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. पण एका पोलीस कर्मचाऱ्यालाच अशाप्रकारे मारहाण झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.