नगर रस्ता, कोथरूड, कात्रज-कोंढवा रस्ता, हडपसर आणि बिबवेवाडी या भागांत या घटना उघडकीस आल्या असून, पोलिसांनी संबंधित ठिकाणी पंचनामा करून तपास सुरू केला आहे.
Pune Fire: कुठं झाडं, तर कुठं गॅलरीच जळाली, ऐन दिवाळीत पुण्यात अग्नितांडव, 3 दिवसांत 68 घटना
लक्ष्मीपूजन केलं अन् सगळंच चोरीला
पहिली घटना नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई परिसरातील एका व्यावसायिकाच्या बंगल्यात घडली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (21 ऑक्टोबर) संध्याकाळी घरात पारंपरिक पूजा मांडण्यात आली होती. मात्र मध्यरात्री चोरट्यांनी स्वयंपाकघराच्या खिडकीची जाळी उचकटून आत प्रवेश केला आणि देवघरात मांडलेले सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण 19 लाख 88 हजार रुपयांचा ऐवज लांबविला.
advertisement
सकाळी पूजा आवरण्याच्या वेळी चोरीचा प्रकार उघड झाला. लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे आणि वरिष्ठ निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरूवात केली आहे.
कोथरूडमध्ये 8 लाखांचे दागिने लंपास
दुसरी घटना कोथरूडमधील लोकमान्य कॉलनी परिसरात घडली. एका महिलेच्या सदनिकेतून 8 लाख 10 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेसाठी दागिने बाहेर काढताना चोरीचा प्रकार लक्षात आला. घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी कपाटातील कप्पा उचकटला होता. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस कर्मचारी माळी तपास करत आहेत.
हडपसरमध्ये महिलेला लुटले
हडपसर भागातील अलकुंटे वस्ती परिसरात शुक्रवारी (23 ऑक्टोबर) एका महिलेकडून 9 लाख 80 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरले. घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून आरोपीने कपाट फोडले आणि दागिने लंपास केले. वानवडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक तपास करत आहेत.
मिठाईचे दुकान फोडले
सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांनाही चोरट्यांनी टार्गेट केले आहे. बिबवेवाडीतील लेकटाऊन सोसायटी परिसरात असलेल्या प्रसिद्ध मिठाई विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 2 लाख 20 हजार रुपयांची रोकड आणि दोन मोबाइल फोन असा 2 लाख 45 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे.
कात्रज-कोंढव्यात घर फोडले
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी 80 हजार रुपयांची रोकड चोरी केली. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक सुकेशिनी जाधव तपास करत आहेत.
पोलिसांचे आवाहन
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सणासुदीच्या काळात घरात महागडे दागिने किंवा रोकड ठेवू नये, तसेच प्रवासाच्या वेळी घर सुरक्षित ठेवावे. परिसरातील सीसीटीव्ही कार्यरत आहेत याची खात्री करावी, तसेच संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. दिवाळीचा सण आनंदाचा असला तरी, या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.






