पुण्यात मानवता प्रतिष्ठानने एक अनोखा संकल्प केला आहे. सर्वधर्मीय जोडप्यांची रोज एक याप्रमाणे 1000 विवाह मोफत लावून दिले जाणार आहेत. त्यासाठी फक्त एकच अट ठेवण्यात आली असून ती म्हणजे आईवडिलांची परवानगी ही आहे. वधू-वरांना लग्न करायचे असल्यास कुठलाही इतर खर्च त्यांना करावा लागत नाही. आजवर अनेक गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत, सर्वधर्मीय कुटुंबांनी या शिस्तबद्ध व आटोपशीर विवाह सोहळ्यात सहभागी होऊन समाजपरिवर्तनाच्या उपक्रमाला बळ दिलं आहे.
advertisement
डिजिटल युगातही जगाला भुरळ, पण ढोल नेमका बनतो कसा? कातडी की फायबर चांगला कोणता?
हे सगळं मोफत
मंगल कार्यालय, सजावट, विद्युत रोषणाई, स्टेजवरील नावांचे बॅनर, स्पीकर, बँड, हार, नारळ, मुंडावळ्या, बाशिंग, जेवण, आणि दोन्ही कुटुंबांसाठी फोटो अल्बम यांचा संपूर्ण खर्च मानवता प्रतिष्ठान उचलते. विकास फाटे सांगतात की, “लग्नातला डामडौल हा कुटुंब उद्ध्वस्त करणारा चक्रव्यूह आहे. म्हणून आता विवाहपद्धतीत बदल आवश्यक आहेत. पालकांनी मुला-मुलींचे लग्न कमीत कमी खर्चात व कमीत कमी लोकांमध्ये पार पाडावं आणि शिल्लक पैसे त्यांच्या भविष्यसाठी जतन करावेत. पुढे त्याच पैशातून मुलांनी व्यवसाय सुरू करावा.”
विकास नानांच्या मार्गदर्शनाखाली मानवता प्रतिष्ठानकडून समाजहिताचे विविध उपक्रम राबवले जात आहेत.
तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य आणि मार्गदर्शन पुरवले जाते. बेरोजगारांसाठी रोजगार मेळावे व ट्रेनिंग शिबिरं आयोजित केली जातात. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, फी मदत व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन दिलं जातं. तसंच, आरोग्य तपासणी शिबिरं, मोफत औषध वाटप, आणि वृद्ध, अपंग व महिलांसाठी आधार सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या सर्व उपक्रमांमधून मानवता प्रतिष्ठान समाजात सकारात्मक बदल घडवत आहे.