‘डबल-डेकर फ्लायओव्हर’
कर्वे रोडवर असलेल्या इंटिग्रेटेड डबल-डेकर फ्लायओव्हरप्रमाणेच आता रामवाडी ते वाघोली आणि पुढे विठ्ठलवाडीपर्यंत असा आधुनिक डबल-डेकर फ्लायओव्हर उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प पुणे–शिरूर एलिव्हेटेड कॉरिडॉर योजनेचा एक महत्त्वाचा भाग असणार आहे. या एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या बांधकामासाठीचा खर्च महा मेट्रो आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) या दोन्ही संस्थांकडून संयुक्तरीत्या केला जाणार आहे.
advertisement
काही दिवसांपूर्वीच वनाझ ते चांदणी चौक या मार्गाच्या विस्तारासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रामवाडी ते वाघोली आणि पुढे विठ्ठलवाडी या भागातही मेट्रोचा विस्तार होणार आहे. दोन्ही विस्तार प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे मेट्रो लाईन क्रमांक 2 ची एकूण लांबी सुमारे 28.45 किमीपर्यंत वाढणार आहे. तसेच या मार्गावर एकूण 29 स्टेशनचा समावेश असणार आहे. यामुळे वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
चांदणी चौकात उभारला जाणार पादचारी पूल
मेट्रो लाईन क्रमांक 2 च्या वनाझ ते रामवाडीपर्यंतच्या विस्तारासोबतच पुण्यात आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प राबविण्याची तयारी सुरू आहे. चांदणी चौक परिसरात मुंबई–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग बायपासवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी 580 मीटर लांबीचा पादचारी पूल उभारण्याची योजना पुणे मेट्रोकडून आखण्यात आली आहे.
चांदणी चौक परिसरात उभारला जाणारा मेट्रोचा पादचारी पूल आता विद्यमान पुलाशी जोडला जाणार आहे. या दोन पूलांच्या जोडणीमुळे मुंबई–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंवरून नागरिकांना सुरक्षितपणे पायी प्रवास करता येईल, अशी माहिती पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली.






