पुणे : सांगवी आणि बोपोडीला जोडणाऱ्या पुलावर कमान बसवण्याचे काम सुरू असल्याने, सोमवारपासून पुढील तीन महिन्यांसाठी या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे महापालिकेने या कामाचा सविस्तर आराखडा तयार केला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
advertisement
सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहनवाहतूक बंद
महापालिकेच्या अभियंता विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी–बोपोडी पुलावर नवीन कमान बसवण्याचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी मोठ्या आकाराचे अवजड लोखंडी खांब जोडून कमान उभारली जाणार आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव पुलावरील वाहनवाहतूक आणि पादचाऱ्यांसाठीचा मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे.
हे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे 90 दिवसांचा कालावधी लागणार असून, या काळात नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांना गैरसोय होऊ नये म्हणून दिशादर्शक फलक बसविणे आणि पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांनी सांगितले की, काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. पुलाची सुरक्षितता अधिक वाढवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येणार आहेत. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन, शक्य तितक्या लवकर पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.