रात्रीचे जेवण घेतलं अन् सकाळी...
शिरीष महाराज यांचा मृतदेह सकाळी राहत्या घरात आढळून आला. राहत्या घरात त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. शिरीष महाराज मोरे मंगळवारी रात्री जेवण झाल्यानंतर आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. मात्र, आज सकाळी बराचवेळ होऊनही त्यांनी दार उघडले नव्हते. दार वाजवूनही आतून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी शिरीष महाराज मोरे यांचा गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. त्यांनी आपल्या उपरण्याने खोलीत गळफास लावून घेतला.
advertisement
आत्महत्येचे कारण काय?
शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या का केली, याची चर्चा सुरू आहे. शिरीष महाराज मोरे यांनी सुसाईड नोटमध्ये आपल्या या निर्णयाचे कारण सांगितले असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिरीष महाराज मोरे हे उदरनिर्वाहासाठी प्रवचन आणि कीर्तन करायचे. त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील होते. मात्र, यामधून त्यांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. येत्या 20 फेब्रुवारी रोजी त्यांचा विवाह पार पडणार होता. मात्र, हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. शिरीष महाराज यांनी आर्थिक परिस्थितीच आत्महत्येचे कारण सांगितले आहे.
आज पार्थिवावर अंत्यसंस्कार....
शिरीष महाराज मोरे यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांना आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. संध्याकाळी 4 वाजता देहू गावातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
संघात कार्यरत, वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत…
शिरीष महाराज मोरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रीय होते. संघाचे ते प्रचारक होते. त्याशिवाय शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. “ज्याच्या कपाळावर टिळा नाही, त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा,” असे वादग्रस्त आवाहन केल्याने शिरीष महाराज हे चर्चेत आले होते.