अलीकडे काही ठिकाणी लालपरी बंद पडल्यानंतर प्रवाशांना शिवशाही किंवा ई-शिवाई बसमध्ये प्रवेश नाकारल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. काही प्रकरणांमध्ये प्रवाशांकडून तिकिटाच्या फरकाची रक्कम मागितली जात असल्याचेही निदर्शनास आले. ही बाब गंभीर असून, अशा प्रकारे प्रवेश नाकारल्यास किंवा अधिक पैसे मागितल्यास संबंधित वाहक व चालकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा परिवहन मंत्र्यांनी दिला आहे.
advertisement
एसटी महामंडळाच्या नियमानुसार, प्रवासादरम्यान बस बिघडल्यास त्या मार्गावरून येणाऱ्या इतर कोणत्याही एसटी बसमधून प्रवास करण्याचा हक्क प्रवाशांना आहे. बस उच्च श्रेणीची असली तरीही कोणतेही अतिरिक्त शुल्क, भाडे फरक किंवा आकारणी करता येणार नाही. या सुधारित निर्णयाचे परिपत्रक महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून सर्व आगारांना पाठवण्यात आले आहे.
ग्रामीण व दुर्गम भागात, तसेच वाहतूक कमी असलेल्या आडरानात एसटी बस बंद पडल्यास प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. चोरी, लूट किंवा जिवाला धोका अशा परिस्थितीत निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बस बंद पडल्यास पुढे काय करायचे? हा प्रश्न प्रवाशांना भेडसावत होता. मात्र, नव्या निर्णयामुळे हा पेच सुटून प्रवाशांचा सुरक्षित व सुलभ प्रवास सुनिश्चित होणार आहे.
प्रवासादरम्यान नियमानुसार एशियाड, हिरकणी, शिवनेरी, शिवशाही किंवा ई-शिवाई बसमध्ये प्रवेश नाकारल्यास प्रवाशांनी तात्काळ आगार प्रमुख, वाहतूक नियंत्रक किंवा विभाग नियंत्रकांकडे तक्रार करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. ग्राहक सेवा कायद्यानुसार एसटी प्रवाशांना विनाशुल्क व तातडीने पर्याय देणे हा त्यांचा हक्क असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
या निर्णयामुळे एसटी प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, भविष्यात अशा प्रकारच्या तक्रारींना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






