महामार्गावरील रेल्वे गाड्यांची चाचणी पूर्ण
6 नोव्हेंबरला रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी पुणे–मिरज मार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांनी त्या भागावर रेल्वेची चाचणीही घेतली आणि चाचणीदरम्यान गाडी ताशी 130 किलोमीटरच्या वेगाने धावली. या पाहणीनंतर पुणे–मिरज दुहेरीकरणाचे काम पूर्णत्वाला पोहोचले असून आता हा मार्ग पूर्णपणे कार्यान्वित झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दुहेरीकरणामुळे प्रवासी आणि मालगाड्यांचा वेग वाढेल, तसेच या मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत चालणार आहे.
advertisement
पुणे–मिरज प्रकल्पाचे एकूण अंतर जवळपास 280 किलोमीटर आहे. कोरेगाव–रहिमतपूर–तारगाव हा शेवटचा टप्पा पूर्ण झाल्याने आता संपूर्ण मार्गावर दुहेरी रुळांवर वाहतूक सुरू झाली आहे. मध्य रेल्वेने या मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण 2016 मध्ये सुरू करण्यात आले होते आणि हे काम मे 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र कोरोनाकाळात कामाची गती मंदावली. जुन्या मार्गावर विद्युतीकरण करताना तांत्रिक अडचणी आल्या आणि काही ठिकाणी भूसंपादनासाठी स्थानिक विरोधही झाला. या कारणांमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला.
आठवड्याला 22 गाड्या
पुणे–मिरज मार्गावर सध्या दररोज साधारण नऊ ते दहा गाड्यांची वाहतूक होते. यामध्ये सहा एक्सप्रेस आणि तीन पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहे. आठवड्याला एकूण 22 गाड्या या मार्गावर धावतात, त्यापैकी 11 एक्सप्रेस गाड्या साप्ताहिक स्वरूपात चालवल्या जातात. या मार्गावर दररोज धावणाऱ्या प्रमुख गाड्यांमध्ये महालक्ष्मी एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस आणि वंदे भारत या गाड्यांचा समावेश आहे.
विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य चैतन्य जोशी यांनी सांगितले की, पुणे–मिरज मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाल्यामुळे प्रवाशांचा प्रवास वेळ कमी होईल. या मार्गावर रेल्वेचे जाळे विस्तारल्याने गाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता असून त्यामुळे प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध होतील. या बदलाचा फायदा रेल्वेला आणि प्रवाशांना दोघांनाही होणार असल्याचे त्यांनी सांगितले.






