यशवंत महाराजांची संजीवन समाधी
राजुरा बाजार ते मुसळखेडा पायी पालखी सोहळ्याबाबत माहिती देताना ग्रामस्थ सांगतात की, परमहंस श्री यशवंत महाराज हे मूळचे धोतरखेडा या गावचे होते. त्यानंतर त्यांनी काही काळ अमरावती रोडवरील माहुली जहांगीर याठिकाणी काढला. त्यानंतर वरूड तालुक्यातील चांदस वाठोडा या गावातील जिचकार गुरुजी यांची महाराजांवर अपार श्रद्धा होती.
advertisement
Upwaas Thali: एक-दोन नाही तर एकाच थाळीत 12 पदार्थ, ठाण्यात इथं श्रावणातील उपवास वाटेल परिपूर्ण
त्यांनी 1950 साली यशवंत महाराजांना चांदस या गावी आणले. त्यानंतर पंचक्रोशीत महाराजांचे भ्रमण होत असे. प्रवासासाठी ते रेंगी हे साधन वापरत होते. काही काळानंतर महाराजांनी मुसळखेडा याठिकाणी संजीवन समाधी घेतली, अशी माहिती अमरदीप खाडे यांनी दिली.
35 गावाच्या सहकाऱ्यातून कार्यक्रम
पंचक्रोशीतील भक्तगण महाराजांना अजूनही गुरू मानतात. महाराजांची समाधी अजूनही भक्तांना पावते, असे ग्रामस्थ सांगतात. गावोगावी महाराजांनी आपली प्रचिती दिली. त्यातीलच एक गाव म्हणजे राजुरा बाजार. विदर्भातील सर्वात मोठा बैल बाजार असलेलं हे गाव. या गावात देखील गावकऱ्यांनी यशवंत महाराजांच्या मूर्तीची स्थापना केली.
त्यानंतर राजुरा बाजार ते मुसळखेडा याठिकाणी पायी पालखी सोहळा सुरू करण्यात आला. सुरुवातीला या सोहळ्याचं स्वरूप अतिशय छोटं होतं. कालांतराने आजूबाजूच्या गावातील सहभाग मिळाला आणि 35 गाव मिळून हा कार्यक्रम करण्यात येत आहे. या सर्व गावातील पालखी मंडळ येतात आणि पायदळ यात्रेमध्ये सहभागी होतात. 35 गावातील लोकवर्गणीतून या कार्यक्रमाचा महाप्रसाद होतो. जवळपास 35 ते 40 क्विंटलचा महाप्रसाद मुसळखेडा येथे केला जातो, अशी माहिती ग्रामस्थ प्रमोद वाघ यांनी दिली.
11 किमी पायी पालखी सोहळा
राजुरा बाजार ते मुसळखेडा हे 11 किमी अंतर बालगोपाल, वयोवृद्ध महिला आणि इतरही सर्वजण 3 तास पायदळ चालून पूर्ण करतात. या रोडवर श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी जणू काही पंढरपूर अवतरल्यासारखे वाटते. यशवंत महाराजांची पालखी, रेंगी सजवली जाते. गावातील एक बैलजोडी त्या रेंगीला जुंपली जाते आणि हरिनामाच्या गजरात पालखी रवाना होते. या सोहळ्यात 25 ते 30 हजार लोकं येतात. सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पाडतो, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.