श्री कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत असून, या मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाबाई यांनी मंदिरात येऊन दर्शन घेतलं आहे. शिवकालापासून चालत आलेल्या परंपरेनुसार दर शनिवारी आणि बुधवारी मूर्तीवर शेंदूर लेपण केले जाते. या सततच्या लेपामुळे गेल्या चारशे वर्षांत मूर्तीवर जाड शेंदूराचे कवच तयार झाले. अलीकडे हे कवच निखळू लागल्याने मूर्तीच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीची कारवाई आवश्यक झाली.
advertisement
नाशिकवरून होतोय सुपर हायवे! अक्कलकोट 4 तासांत, तिरुपती 12 तासांत, पाहा कसा असेल मार्ग?
शेंदूर कवच काढण्याची संपूर्ण प्रक्रिया शास्त्रानुसार, धार्मिक विधी करून आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करण्यात येणार आहे. मूर्तिशास्त्र तज्ञ, धर्मगुरू तसेच पुरातत्व विभागाकडूनही मार्गदर्शन घेतले गेले आहे. ही प्रक्रिया अत्यंत नाजूक असल्याने साधारण तीन आठवडे लागू शकतात. प्रत्यक्ष कामाच्या प्रगतीवर आधारित हा कालावधी कमी किंवा जास्तही होऊ शकतो.
या दरम्यान मंदिरातील दैनंदिन पूजा आणि इतर धार्मिक विधी मूळ गाभाऱ्यातील मुख्य पूजेच्या मूर्तीशिवाय अन्य नियोजनबद्ध मार्गाने पार पाडले जाणार आहेत. मात्र भाविकांसाठी मंदिर परिसर संपूर्णपणे बंद राहील. भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
शेंदूर कवच काढल्यानंतर मूर्ती आपल्या मूळ स्वरूपात दर्शनास येईल. ही पुणेकरांसाठी नवी आणि ऐतिहासिक अनुभूती असणार आहे. देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले की, कामाचा आढावा वेळोवेळी घेऊन मंदिर शक्य तितक्या लवकर पुन्हा भाविकांसाठी खुले करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
इसवी सन 1614 च्या आसपासच्या ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये कसबा गणपतीचा उल्लेख आढळतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जय मिळवून देणारा जयति गजानन असे वर्णन केलेल्या या देवस्थानाचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यात महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक वर्षी गणेशोत्सवाच्या काळात पहिल्या मानाच्या गणपती म्हणून या मंदिराचे विशेष महत्त्व असते.
श्रींच्या मूर्तीचे जतन, संरक्षण आणि भविष्याकरीता सुरक्षितता या उद्देशाने घेतलेला हा निर्णय पुणेकरांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. तीन आठवड्यांच्या या विशेष शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रियेनंतर भाविकांना मूळ रूपातील ग्रामदैवताचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. मंदिर प्रशासनाने पुणेकरांना संयम बाळगण्याचे आवाहन केले असून, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि शास्त्रोक्त पद्धतीने पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.





