श्री क्षेत्र कोंडेश्वर बाबत माहिती घेण्यासाठी लोकल 18 ने संस्थानचे कोषाध्यक्ष रामकृष्ण लांडोरे यांच्याशी संवाद साधला. तेव्हा ते सांगतात की, श्री क्षेत्र कोंडेश्वर हे पाच हजार वर्ष जुने आहे. अतिशय प्राचीन असे हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धाराला 50 वर्ष झालीत. 1 रुपयाच्या वर्गणीपासून या मंदिराच्या जीर्णोद्धाराला वर्गणी मिळाली. तेव्हापासून आजपर्यंत या मंदिरात अनेक बदल घडून आलेत. भक्तांसाठी विविध सोयी याठिकाणी करण्यात आल्या. आता महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात याठिकाणी भक्तांची अफाट गर्दी असते. श्रावण सोमवारी शिवलिंगाची विशेष सजावट याठिकाणी केली जाते, या मंदिराचा उल्लेख अनेक ठिकाणी केला गेला आहे, असे ते सांगतात.
advertisement
मंदिराची आख्यायिका काय?
याबाबत माहिती देताना कोषाध्यक्ष सांगतात की, या मंदिरात असलेली पिंड पाच हजार वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आली. ही पिंड काशीला स्थित असलेल्या कौंडिण्य ऋषीच्या हस्ते स्थापन करण्यात आली होती. विदर्भ राजा हा ब्रह्मावर्ताचा मूळनिवासी होता. तो शिवभक्त होता त्यामुळे त्याने काशीवरून कौंडिण्य ऋषीला बोलावून त्यांच्या हस्ते ही शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली होती. त्यामुळे या तीर्थक्षेत्राला कोंडेश्वर असे नाव देण्यात आले.
ही पिंड स्थापन केली तेव्हा मंदिराचा गाभारा अतिशय छोटासा होता. राजा रामदेवराय यादव यांच्या काळात त्यांचे पंतप्रधान हेमाजी पंत यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे पुराणामध्ये नमूद आहे आणि वेदांमध्ये सुद्धा याचा उल्लेख आलेला आहे. त्यांनीच हे मंदिर हेमाडपंथी बांधल्याचा इतिहास आहे. त्याचबरोबर हजारो वर्षांपूर्वी ऋषिमुनींचे वास्तव्य देखील या परिसरात होते, असे कोषाध्यक्ष सांगतात.