महाराष्ट्रातील असं एक संस्थान, जिथे दिला जातो निराधारांना आधार, होतकरू मुलांनाही शिक्षणासाठी केली जाते मदत, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
याठिकाणी नवनवीन उपक्रम राबविले जातात. शेतीविषयक उपक्रम, शैक्षणिक उपक्रम, सामाजिक उपक्रम आणि यासारखे अनेक उपक्रम राबवून सामाजिक कार्य हे संस्थान करीत आहे.
वर्धा: वर्धा जिल्ह्यातील टाकरखेडा या गावात श्री संत लहानुजी महाराजांचे समाधी स्थळ आहे. श्री संत लहानुजी महाराज संस्थान टाकरखेडा याठिकाणी नवनवीन उपक्रम राबविले जातात. शेतीविषयक उपक्रम, शैक्षणिक उपक्रम, सामाजिक उपक्रम आणि यासारखे अनेक उपक्रम राबवून सामाजिक कार्य हे संस्थान करीत आहे. मुलांना मोफत अभ्यासिका देखील याठिकाणी आहे. त्याचबरोबर अनेक वृद्धांना देखील आधार दिला आहे. त्या ठिकाणी राहणाऱ्या प्रत्येकासाठी वैद्यकीय सुविधा देखील त्याठिकाणी आहे. त्यांच्या या सर्व उपक्रमाबाबत माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक बाळासाहेब पावडे यांनी दिली आहे.
श्री संत लहानुजी महाराज संस्थान टाकरखेडा येथील कार्यकारी संचालक बाळासाहेब पावडे यांनी लोकल18 शी तेथील उपक्रमाबाबत चर्चा केली. तेव्हा ते सांगतात की, आमच्या या संस्थेत तीन महत्त्वाच्या योजना चालतात: शाश्वत अन्नदान योजना, गोसेवा योजना, गुरुदक्षिणा योजना. या तिन्ही योजना मिळून होणारी रक्कम आम्ही खर्च करीत नाही. ती बँकमध्ये फिक्स असते. त्यावरील व्याज घेऊन आम्ही सर्व संस्थेचा खर्च भागवितो.
advertisement
शाश्वत अन्नदान योजना
पुढे ते सांगतात की, आमच्याकडील सर्वात पहिली योजना आहे, ती म्हणजे शाश्वत अन्नदान योजना. या योजनेच्या माध्यमातून आम्ही संस्थेतील सर्व लोकांना आणि संस्थेत भेटी देणाऱ्या सर्वांना अन्नदान करतो. दररोज 250 ते 300 लोकं आमच्या संस्थेत जेवण करतात. ही अन्नदान योजना आम्ही लोकवर्गणीतून चालवतो. ज्याला कोणाला अन्नदान करायचे असेल त्यांनी 1001 रुपयाची पावती देऊन आमच्या इथे अन्नदान करू शकतात. ही पावती एकदाच द्यायची आहे. त्यानंतर संपूर्ण आयुष्यभर त्या व्यक्तीच्या नावाने आम्ही अन्नदान सुरू ठेवतो, अशी ही आमची शाश्वत अन्नदान योजना आहे, असे त्यांनी सांगितले.
advertisement
गोसेवा योजना
संत लहानुजी महाराज हे वर्धा नदीच्या काठी गाई चारत होते. त्यांनी अनेक वर्ष गोसेवा केली. त्यांच्या प्रेरणेतून आम्ही गोसेवा सुरू केली. आमच्या गोरक्षणमध्ये सध्या 450 गाई आहेत. त्यांचा सांभाळ आम्ही करतो आहे. अनेक लोक आमच्या गोरक्षणात गाई आणून सोडतात. सध्या आमच्याकडे 480 गाई आहेत. मग, या गाईंचा चारा, पाणी, औषध हा खर्च कसा करायचा? तर यासाठी ही गोसेवा योजना आहे. त्यात 1101 रुपयाची पावती देतात. गाई संख्येने जास्त आहेत, त्यामुळे त्यांच्या मल-मूत्राचा वापर डायरेक्ट शेतात करणे शक्य नव्हते. इतके खत आम्ही शेतात वापरले असते तरीही ते उरेल इतके होते. म्हणून आम्ही हा गोबरगॅस प्लांट सुरू केला, असे ते सांगतात.
advertisement
होतकरू मुलांसाठी मोफत अभ्यासिका
आमच्या संस्थेतील शैक्षणिक उपक्रम म्हणजे लहानु अभ्यासिका आणि मार्गदर्शन केंद्र. ही अभ्यासिका कोरोना काळात होतकरू विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली. या अभ्यासिकेत प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांना कुठलीही फी लागत नाही. त्यांना सर्व सुविधा संस्थानमार्फत दिल्या जातात. या अभ्यासिकेतून आतापर्यंत जवळपास 29 विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू झाले आहेत. त्या सर्व मुलांना मोफत राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था आणि आरोग्य तपासणी सुद्धा दिली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
advertisement
10 रुपयांत आरोग्य सुविधा
आमच्या संस्थेतील सर्व लोकांना आम्ही फक्त 10 रुपयांत आरोग्य तपासणी आणि औषध उपलब्ध करून देतो. निराधार लोकांची संख्या 26 आहे. तसेच शैक्षणिक उपक्रमातील मुलं 40 आहेत. त्या सर्वांना फक्त 10 रुपयांत आरोग्य सुविधा देण्यात येते. गावातील 2 डॉक्टर याठिकाणी येतात. आठवडाभर आळीपाळीने येऊन ते संस्थेतील सर्वांना सुविधा देतात.
advertisement
असेच आणखी बरेच उपक्रम आम्ही राबवितो. शेतीविषयक अनेक उपक्रम आहेत. सेंद्रिय शेती, गांडूळ खत, शेण खत, गोमूत्र अर्क यासारखे अनेक शेती उपयोगी प्रॉडक्ट आमच्याकडे तयार केले जातात. अशी आमची संस्था काम करते, अशी माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक बाळासाहेब पावडे यांनी दिली.
Location :
Wardha,Wardha,Maharashtra
First Published :
August 01, 2025 10:13 PM IST
मराठी बातम्या/ वर्धा/
महाराष्ट्रातील असं एक संस्थान, जिथे दिला जातो निराधारांना आधार, होतकरू मुलांनाही शिक्षणासाठी केली जाते मदत, Video