विठ्ठलवाडीतील हे मंदिर 1732 पूर्वी बांधले गेले असे मानले जाते. मात्र, मंदिराचे मूळ बांधकाम 15 व्या शतकाच्या पूर्वार्धात आणि 14 व्या शतकाच्या उत्तरार्धात झाल्याचा इतिहास सांगतो. मंदिराचे बांधकाम एकूण तीन टप्प्यांमध्ये पूर्ण झाले आहे. या मंदिराचा इतिहास केवळ स्थापत्यापुरता मर्यादित नाही, तर तो एका भक्ताच्या अद्वैत भक्तिभावाशी जोडलेला आहे.
advertisement
छत्रपती संभाजी महाराज हे स्वतः विठ्ठलभक्त होते. पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ते दर पंधरा दिवसांनी पंढरपूरला जात असत. त्यांच्या भक्तिभावाला विठ्ठलाने स्वप्नात दृष्टांत दिला की, तुझे वय झाले आहे, आता तू थांब, मीच तुला भेटायला येतो. त्यानंतर याच ठिकाणी मंदिराची स्थापना झाल्याचे मानले जाते. हे मंदिर म्हणजे भक्तीचे जिवंत उदाहरण आणि त्या काळातील भक्तांची श्रद्धा यांचे प्रतीक आहे.
या मंदिराच्या बाजूला मुठा नदीचे पात्र आहे, आणि तिथेच पुंडलिकाचेही एक छोटे मंदिर आहे. या मंदिराच्या ठिकाणी मुठा नदीस देखील पंढरपूरच्या चंद्रभागेसारखे वळण आहे, आणि त्यामुळेच प्रतिपंढरपूर ही ओळख मिळाली आहे. यामुळेच अनेक पुणेकर आणि आसपासचे भाविक इथे येऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतात आणि पुण्याचे पंढरपूर अनुभवतात.
पंढरपूर गाठणे शक्य न झालेल्या भाविकांसाठी हे मंदिर विशेष महत्त्वाचे आहे. आजही इथे आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, आणि अनेक उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरे केले जातात. विठ्ठलवाडी परिसर हा आषाढी वारीच्या काळात भक्तांनी फुलून जातो. मंदिरात दिंड्या, भजन, कीर्तन यांचा गजर असतो आणि भक्तीमय वातावरण निर्माण होते.
मंदिर समितीचे अध्यक्ष कुमार गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मंदिराचे व्यवस्थापन, साफसफाई आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ही समिती नियमितपणे करत असते. स्थानिक भक्त, कार्यकर्ते, आणि भाविक यांच्या सहभागामुळे हे मंदिर जिवंत राहिले आहे.
पुण्यात असलेले हे विठ्ठलवाडी मंदिर म्हणजे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर तो एक असा आध्यात्मिक वारसा आहे, जिथे भक्ती, इतिहास आणि सांस्कृतिक परंपरा एकत्र नांदतात.