पुणे : भारतीय क्रिकेट संघाने तब्बल 12 वर्षांचा दुष्काळ संपवत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलंय. रविवारी दुबईतील मैदानावर भारत आणि न्यूझिलंड यांच्यात रंगतदार अंतिम सामना झाला. चुरशीच्या या सामन्यात भारताने 4 गडी राखून विजय मिळवला. विशेष म्हणजे भारताने स्पर्धेतील सर्वच्या सर्व सामने जिंकत विजेतेपद पटकावलं आहे. त्यामुळे संपूर्ण देशात होळीआधीच दिवाळी साजरी होताना दिसत आहे. पुण्यातील क्रिकेटप्रेमींनी देखील भारताच्या विजयानंतर मोठा जल्लोष केला.
advertisement
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने दुसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. यामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. पुण्यातील तरुणाईच मोठं आकर्षण असलेल्या गुडलक चौक इथे मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी रस्त्यावर उतरून जल्लोष करताना दिसले. हातात तिरंगा, ‘भारत माता की जय’चा जयघोष आणि फटाक्याची अतिषबाजी केलेली देखील रात्री उशिरापर्यंत पाहायला मिळाली.
दरम्यान, टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची ही तिसरी वेळ ठरली. टीम इंडियाने या विजयासह इतिहास घडवला असून ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडून काढला आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेमींचा आनंद आणि उत्साह अगदी ओसंडून वाहत असल्याचे दिसून येत आहे. पुण्यात तरुणाईसह महिला, मुले आणि अगदी वयस्कर मंडळीही या जल्लोषात सहभागी झाली होती. यावेळी रस्त्यावर हजारोंच्या संख्येने पुणेकर दिसत होते.





