रोहित शर्मा आणि विराट कोहली भारताकडून शेवटचा सामना मार्च 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये खेळले होते. यानंतर दोन्ही खेळाडूंनी आयपीएलमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली. आता टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात होणाऱ्या 3 वनडे मॅचच्या सीरिजसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीची भारतीय टीममध्ये निवड झाली आहे.
रोहित-विराटचं कमबॅक संकटात
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे जुलै महिन्यात कमबॅक करणार होते, पण बीसीसीआयने बांगलादेशचा दौरा रद्द केल्यामुळे दोघांचंही कमबॅक लांबणीवर पडलं. आता 19 ऑक्टोबरला रोहित आणि विराट ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ वनडेमध्ये मैदानात उतरतील, पण हा सामनाही संकटात सापडला आहे. पश्चिम ऑस्ट्रेलियामधील हवामान रोहित आणि विराटच्या कमबॅकमध्ये खोडा घालू शकतं. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थमध्ये पहिली वनडे होणार आहे, पण बीबीसी आणि एक्यूवेदरच्या वृत्तानुसार 18 ऑक्टोबर आणि 19 ऑक्टोबरला पर्थमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 18 ऑक्टोबरच्या रात्री लागोपाठ अडीच तास पाऊस पडेल, तर 19 ऑक्टोबरच्या सकाळीही पाऊस असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला सामना पावसामुळे रद्द झाला तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं कमबॅक आणखी लांबणीवर पडेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली दुसरी वनडे 23 ऑक्टोबर आणि तिसरी वनडे 25 ऑक्टोबरला खेळवली जाणार आहे.
रोहित-विराट भारतात खेळणार
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली भारतामध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठीही विराट-रोहित मैदानात उतरतील, यानंतर जानेवारी 2026 मध्ये न्यूझीलंडची टीम भारताच्या दौऱ्यावर येणार आहे, तेव्हाही वनडे मॅचची सीरिज होणार आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये विराट आणि रोहित 2027 चा वर्ल्ड कप खेळणार का नाही? याचं उत्तरही मिळणार आहे.