भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी हे दोघं पुढचा वर्ल्ड कप खेळतील का नाही? याबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. विराट आणि रोहितचं 2027 चा वर्ल्ड कप खेळणं फॉर्म, फिटनेस आणि त्यांचं खेळासाठी असलेलं वेड यावर अवलंबून आहे. येणारा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांच्या या पैलूंची परीक्षा होईल, असं रवी शास्त्री म्हणाले आहेत. रोहित आणि विराटला त्यांचा जागा पक्की करण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मजबूत कामगिरी करावी लागेल, अशी प्रतिक्रियाही शास्त्री यांनी दिली आहे.
advertisement
ऑस्ट्रेलिया सीरिजनंतर निर्णय
रवी शास्त्री 'काया स्पोर्ट्स'च्या 'समर ऑफ क्रिकेट लॉन्च इव्हेंट'मध्ये बोलत होते. 'यासाठीच विराट आणि रोहित इकडे आहेत. दोघेही टीमच्या नियोजनाचा भाग आहेत. त्यांचा फिटनेस फॉर्म आणि खेळासाठी असलेला वेडेपणे यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धची सीरिज खूप महत्त्वाची आहे, या सीरिजनंतर त्यांना स्वत:ला समजेल, की त्यांना काय वाटत आहे, त्यानंतरच ते निर्णय घेतील', असं वक्तव्य रवी शास्त्रींनी केलं आहे.
'मोठ्या सामन्यांमध्ये अनुभव गरजेचा असतो, ज्यात रोहित विराटला पर्याय नाही. आपण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही हे बघितलं आहे. मोठ्या सामन्यांमध्ये मोठे खेळाडूच पुढे असतात', असं रवी शास्त्री म्हणाले आहेत.
रोहित शर्मा आणि विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता फक्त वनडे क्रिकेटच खेळत आहेत. भारतीय टीम पुढची दोन वर्ष म्हणजेच 2027 वर्ल्ड कपपर्यंत खूपच कमी वनडे क्रिकेट खेळणार आहे, त्यामुळेच या दोघांच्या वर्ल्ड कपमधल्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली 7 महिन्यांपूर्वी भारताकडून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये खेळले होते, ज्यात टीम इंडियाचा विजय झाला होता. रोहित शर्मा फायनलमध्ये प्लेयर ऑफ द मॅच होता, तर कोहलीने पूर्ण स्पर्धेत टीम इंडियाला ट्रॉफी जिंकवण्यात मोलाचं योगदान दिलं. विराट कोहली सर्वाधिक रन करणाऱ्या टॉप-5 खेळाडूंच्या यादीत होता.