भारत–EU मुक्त व्यापारामुळे अमेरिका अस्वस्थ झाली आहे. कारण, ट्रम्प प्रशासनाला वाटत होतं की टॅरिफच्या जोरावर भारताला जागतिक पातळीवर अलगद कोपऱ्यात ढकलता येईल. मात्र भारताने थेट युरोपसारख्या मोठ्या बाजाराकडे वाटचाल केली आणि त्याचा परिणाम ‘मदर ऑफ ऑल डील’ म्हणून समोर आला.
भारताने टॅरिफला मात दिली
जागतिक अर्थतज्ज्ञांच्या मते, भारत–EU ट्रेड डील केवळ व्यापार करार नाही; तो भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या दिशेने टाकलेलं निर्णायक पाऊल आहे. रोजगारनिर्मिती, परदेशी गुंतवणूक, निर्यात आणि जागतिक प्रभाव या चारही आघाड्यांवर भारताला याचा थेट फायदा होणार आहे.
advertisement
अमेरिकेची अडचण इथेच आहे. 30 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेवर भारत अवलंबून आहे, असा समज करून अमेरिका पुढे चालली होती. पण भारताने दुसऱ्या क्रमांकाच्या (EU) जागतिक बाजाराशी थेट भागीदारी करून तो समजच मोडून काढला.
2027 पासून अंमलबजावणी, परिणाम आजपासून
हा करार 2027 मध्ये प्रत्यक्ष अंमलात येणार असला, तरी त्याचे परिणाम आतापासून जाणवू लागले आहेत. भारताला आता व्यापार आणि टॅरिफच्या धमक्यांनी दाबणं सोपं राहणार नाही.
या कराराचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा व्याप जागतिक व्यापाराचा जवळपास एक-तृतीयांश आणि ग्लोबल GDP च्या सुमारे 25 टक्के वाटा या डीलच्या कक्षेत येतो. जगातील दुसरी (EU) आणि चौथी (भारत) सर्वात मोठी अर्थव्यवस्था आता एकत्र पुढे चालणार आहेत.
9,425 भारतीय उत्पादनांवर ‘झिरो टॅरिफ’
या डीलमुळे भारताला सुमारे 75 अब्ज डॉलरची अतिरिक्त निर्यात संधी मिळणार आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे भारतातील तब्बल 9,425 उत्पादनांवर युरोपियन युनियनमध्ये कोणताही टॅरिफ लागणार नाही.
यामुळे भारतीय उद्योगांसाठी एक नवं एक्सपोर्ट इंजिन तयार होईल. युरोपियन ग्राहकांपर्यंत थेट पोहोच मिळाल्याने MSME क्षेत्राला सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे.
सर्व्हिस सेक्टरसाठी सुवर्णसंधी
हा करार केवळ वस्तूंपुरता मर्यादित नाही. युरोपमधील 144 सर्व्हिस सेक्टर्स भारतीय प्रोफेशनल्ससाठी खुले होतील.
विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर किमान 9 महिन्यांचा वर्क-वीजा
आयुष, पारंपरिक भारतीय वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञांना युरोपमध्ये कामाची संधी
यामुळे भारताच्या सर्व्हिस एक्सपोर्टला मोठी चालना मिळणार आहे.
सामान्य ग्राहकांनाही दिलासा
या कराराचा परिणाम थेट सामान्य लोकांवरही दिसेल.
युरोपमधून येणारे ऑलिव्ह ऑइल, व्हेजिटेबल ऑइल, मार्जरीन स्वस्त होतील
लक्झरी कार्सवरील टॅक्स 110% वरून टप्प्याटप्प्याने 10% पर्यंत कमी होईल
प्रीमियम दारू, वाइन, स्पिरिट्स आणि बीयरही स्वस्त होणार
पुढचं पाऊल: संरक्षण क्षेत्रात महासत्ता?
मोठा प्रश्न असा आहे की, EU सोबतच्या या FTA नंतर संरक्षण सहकार्य वाढून भारत डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगचा मोठा केंद्र बनेल का? तज्ज्ञांच्या मते, ही भागीदारी भारताला लष्करी उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने नेऊ शकते. यामुळे जागतिक वर्ल्ड ऑर्डरमध्येही भारताची भूमिका अधिक ठळक होण्याची शक्यता आहे.
