कोण आहेत तिघे रिल्स स्टार?
विशाल बनगोडी, बालाजी डांगे आणि निवृत्ती परीट हे तिघे मूळचे इचलकरंजीचे आहेत. सुरुवातीला टिक टॉक या ॲप्लिकेशनचा आधार घेऊन यातील दोघांनी व्हिडिओ करायला सुरुवात केली होती. टिक टॉक बंद झाल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा इंस्टाग्रामकडे वळवला. हळूहळू हे तिघे त्यांच्या शैलीमुळे प्रसिद्ध होऊ लागले. सुरुवातीला त्यांनी विनोदात्मक शैलीतून वेगवेळ्या पद्धतीने व्हिडिओ केले. पण त्यांना प्रेक्षकांकडून तितका प्रतिसाद मिळत नव्हता. त्याकाळी काही व्हिडिओजमध्ये शिव्यांचा वापर होत होता. हे बघून या तिघांनीही अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवण्याचं त्यांनी ठरवलं.
advertisement
शिवराळ भाषेला लोकांचा प्रतिसाद
सामाजिक संदेश देणाऱ्या व्हिडिओंना लोकांचा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे शिवराळ भाषेत रिल्स करायला सुरुवात केली. तेव्हा प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळायला लागला. या संदर्भात बालाजी डांगे सांगतो की, “कोल्हापुरात राहत असल्याने शिव्यांचा तसा आपल्या भाषेमध्ये प्रभाव पाहायला मिळतो. एकंदरीतच लोकांनाच चांगलं बघायची आवड नाहीये. त्यांना अश्लील भाषा किंवा शिवराळ भाषा आपलीशी वाटते. लोकांना आपल्या बोलीभाषे बाबतीत प्रचंड आवड आहे आणि त्या पद्धतीनेच आम्ही असे व्हिडिओ बनवण्याचं सुरू केलं.”
आक्षेपार्ह रिल्स अंगलट
विशाल, बालाजी आणि निवृत्ती यांनी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचे रिल्स व्हायरल झाले. त्यानंतर कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या तिघा तरुणांना कार्यालयात बोलावून समज दिली. “पोलिसांनी आम्हाला कार्यालयात बोलवून घेतले होते. आम्ही बनवत असलेल्या रिलमुळे लहान मुलांवर त्याचे परिणाम होत आहेत, असं समजावून सांगण्यात आलं. त्यानंतर माफी नाम्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड केला, असं विशालने सांगितलं.
माफीनामा व्हायरल
पोलिसांनी तिघा रिल्स स्टार्सकडून माफीनाम्याच व्हिडिओ घेतला. हा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला. त्यानंतर स्टार्सवर नेटकऱ्यांनी अक्षरशः कमेंट्सचा वर्षाव केला. विशालच्या म्हणण्याप्रमाणे, आम्ही बनवलेल्या शिवराळ भाषेतील रिलचे खूप चाहते आहेत. लोकांनाच आमच्या तोंडून शिव्या ऐकाव्यात असं त्यांना वाटत असतं. रिलमध्ये विनोद आणि शिव्या मुक्तपणे असतात. त्यामुळे विषय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडला गेला आणि लोकांच्या पसंतीला लवकर आला होता. त्यामुळे लोकांच्याच पसंतीने आम्ही अशा प्रकारचे रिल बनवत होतो, असं या रिल स्टार्सचं म्हणणं आहे.