'तुमचा मुलगा कुठे लपलाय', मध्यरात्री 40 तरुण घरात घुसले, मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवला अन्.., बीडला हादरवणारी घटना!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Beed: बीड जिल्ह्याला हादरवणारी घटना समोर आली आहे. ३० जूनला मध्यरात्री ३० ते ४० जणांच्या टोळक्याने एका कुटुंबाला बेदम मारहाण केली आहे.
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये गुन्हेगारी वाढतच चालली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. हे हत्याकांड उघडकीस आल्यानंतर देखील बीडमध्ये गुन्हेगारी कमी होताना दिसत नाही. अशात आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला हादरवणारी घटना समोर आली आहे. ३० जूनला मध्यरात्री ३० ते ४० जणांच्या टोळक्याने एका कुटुंबाला बेदम मारहाण केली आहे.
आरोपींनी घरात शिरून कुटुंबातील एका मुलीवर चाकू उगारून कुटुंबाला मारहाण केली आहे. मारहाणीची ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मध्यरात्री अशाप्रकारे ३० ते ४० तरुणांनी अशाप्रकारे घरावर हल्ला केल्यानं पीडित कुटुंब दहशतीत आहे. टोळक्याने कुटुंबाला मारहाण करत घरातील साहित्यांची तोडफोड केली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बीडच्या शाहूनगर भागातील गजानन कॉलनीत घडली. 30 ते 40 जणाच्या टोळक्याकडून आडागळे कुटुंबावर हल्ला केला. गणेश आडागळे या तरूणाचा काही तरूणांसोबत वाद झाल्यानंतर याच वादातून कुटुंबावर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ३० जूनला रात्री साडेबाराच्या सुमारास आडागळे कुटुंबाला दगडाने मारहाण करत, चाकूचा धाक दाखवत हल्ला करण्यात आला. तुमचा मुलगा कुठे लपला आहे? असा जाब विचारत, चाकूचा धाक दाखवत ही मारहाण करण्यात आली. आपल्या मुलीवर मारेकऱ्यांनी चाकू उगारल्याचा आरोप दिनकर आडागळे यांनी केला आहे.
advertisement
या हल्ल्यात दिनकर आडागळे आणि रेणुका आडागळे हे जखमी झाले आहेत. रात्री उशिरा त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. आम्हाला न्याय द्यावा. आमच्या मुलाच्या जीवाला धोका आहे, असं आडागळे कुटुंबाने म्हटलं आहे. अशाप्रकारे ३० ते ४० जणांच्या टोळक्याने कुटुंबावर हल्ला केल्याने पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था चव्हाट्यावर आल्याचं दिसत आहे.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
Jun 30, 2025 8:29 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
'तुमचा मुलगा कुठे लपलाय', मध्यरात्री 40 तरुण घरात घुसले, मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवला अन्.., बीडला हादरवणारी घटना!









