बीड: परळीतील 'फड गँग'च्या नांग्या ठेचल्या, वाल्मीकच्या आणखी एका टोळीवर मोक्का
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Fad Gang in Parali: बीड पोलिसांनी वाल्मीक कराडची समर्थक असलेल्या आणखी एका गँगच्या नांग्या ठेचल्या आहेत. पोलिसांनी परळीतील कुख्यात 'फड गँग'वर मोक्का लावला आहे.
बीड: गेल्या काही महिन्यांपासून बीडमध्ये संघटीत गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत आहेत. मागच्या पाच महिन्यांत बीड पोलिसांनी चार गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. सगळ्यात आधी ११ जानेवारी २०२५ ला बीड पोलिसांनी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले गँगवर मोक्का लावला होता. यानंतर आठवले गँग, भोसले गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. आता बीड पोलिसांनी वाल्मीक कराडची समर्थक असलेल्या आणखी एका गँगच्या नांग्या ठेचल्या आहेत. पोलिसांनी परळीतील कुख्यात 'फड गँग'वर मोक्का लावला आहे.
दोन वर्षांपूर्वी एका तरूणावर प्राणघातक हल्ला करुन त्याच्याकडील २ लाख ७० हजारांची रक्कम काढून घेतल्याच्या गुन्ह्यात परळीतील रघुनाथ फड गँगवर संघटीत गुन्हेगारी कायदा (मोक्का) नुसार कारवाई करण्यात आली आहे. या गँगच्या ७ जणांवर मकोका लागला असून यातील ५ जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यातील चौघांना यापूर्वी जामीन मिळाला आहे. यातील एक आरोपी सध्या कारागृहात आहे. तर दोन आरोपी फरार आहेत.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
रघुनाथ फड गँगने २०२३ मध्ये केलेल्या गुन्ह्यात अलीकडेच १ मार्च २०२५ रोजी गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाच्या आदेशावरून परळी शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला होता. सहदेव सातभाई यांनी याबाबतची तक्रार दिली होती. संबंधित तक्रारीनुसार, १८ ऑक्टोबर २०२३ रोजी तक्रारदार ट्रॅक्टरचा हप्ता भरण्यासाठी २ लाख ७० हजार रुपये घेऊन दुचाकीवरुन जात होते. ते जलालपूर भागात गेले असता फड गँगने रस्त्यात जीप आडवी लावून तक्रारदाराला अडवलं. यावेळी रघुनाथ फड, जगन्नाथ फड, सुदीप सोनवणे, बालाजी दहिफळे, विलास गिते, धनराज उर्फ राजेभाऊ फड आणि ग्यानदेव उर्फ गोट्या गिते यांनी त्यांना रॉडने मारहाण केली होती.
advertisement
आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी सातभाई यांच्याकडील २ लाख ७० हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार घडल्यानंतर सहदेव सातभाई यांनी परळी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र तेव्हा वाल्मीक कराडच्या दशहतीमुळे परळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. यामुळे सातभाई यांनी न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार घटनेच्या २ वर्षांनी हा गुन्हा नोंद झाला. त्यात फड गैंगवर मकोका लागला.
advertisement
परळीतील फड गँगची दहशत किती?
रघुनाथ फड हा फड गँगचा म्होरक्या आहे. गेल्या काही वर्षांपासून या टोळीने परळीसह अंबाजोगाई तालुक्यात मोठी दहशत निर्माण केली आहे. मागील १० वर्षांत या टोळीवर १० गुन्हे नोंद असून ९ गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत, तर एका गुन्ह्याचा तपास सध्या सुरू आहे. हे सर्व गुन्हे ३ वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असलेले आहेत. यामध्ये खुनाचा प्रयत्न, दुखापत, दंगा, अवैध शस्त्र बाळगणे, सरकारी कामात अडथळा, दरोडा, जबरी चोरी, मारहाण, गंभीर दुखापत, रस्ता अडवणे असे गुन्हे आहेत.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
May 12, 2025 7:51 AM IST









