घरी नेतो सांगून प्रियकराने भलतीकडे नेलं, रक्तबंबाळ अवस्थेत आढळली तरुणी, बापाला फोन आला अन्...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Thane : उल्हासनगर परिसरात कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका तरुणाने प्रेयसीवर जीवघेणा हल्ला केला आहे.
ठाणे: उल्हासनगर परिसरात कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका तरुणाने प्रेयसीवर जीवघेणा हल्ला केला आहे. घरी घेऊन जातो, असं खोटं सांगून आरोपी पीडित तरुणीला वेगळ्याच निर्मनुष्य रस्त्यावर घेऊन गेला. याठिकाणी आरोपीनं पीडितेच्या मानेवर आणि हातावर चाकुने वार केले. पीडित तरुणी जखमी झाल्यानंतर तिला तसंच रस्त्याच्या बाजुला टाकून आरोपीनं घटनास्थळावरून पळ काढला. रस्त्यावरून जाणाऱ्या एका रिक्षाचालकाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर रिक्षाचालकाने पीडितेला रुग्णालयात दाखल केलं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय पीडित तरुणी कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरवली गावात राहते. ११ फेब्रुवारीला ती घरातून अचानक बेपत्ता झाली होती. पीडितेच्या घरच्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला पण तिचा काहीच थांगपत्ता लागला नाही. अखेर पीडितेच्या वडिलांनी कोनगाव पोलीस ठाणं गाठत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
पण तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच मुलीच्या वडिलांना एक फोन आला आणि तुमची मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडल्याची माहिती देण्यात आली. शिवाय एका रिक्षाचालकाने मुलीला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती देखील फोनवरून देण्यात आली. फोनवरून माहिती मिळताच मुलीचे वडील कुटुंबीयांतील इतर सदस्यांसोबत रुग्णालयात दाखल झाले. पण ज्यावेळी त्यांनी मुलीकडे विचारणा केली. यावेळी मुलीनं जे सांगितलं, ते ऐकून वडिलांसह पोलीसही हादरले.
advertisement
पीडितेनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला तिचा प्रियकर कुणाल पासवानने केला आहे. मागील काही महिन्यांपासून पीडितेचं आरोपीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवत पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. पीडितेला टेमघर परिसरात घेऊन जात तिच्या इच्छेविरोधात अत्याचार केला. यानंतर पीडितेनं आरोपीकडे लग्नाची विचारणा केली, यावेळी आरोपीनं घरी घेऊन जातो, असं म्हणत पीडितेला शेलार गावच्या पुढे असलेल्या अंबिका सिटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घेऊन आला. याठिकाणी गेल्यानंतर आरोपीनं अचानक पीडितेच्या मानेवर आणि हातावर वार केले. यानंतर पीडितेला जखमी अवस्थेत घटनास्थळी टाकून पळ काढला.
advertisement
याप्रकरणी पोलिसांनी अपहरण, बलात्कार आणि जीवे मारण्याचा प्रयत्न अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यानंतर पोलिसांनी फरार झालेल्या आरोपी कुणाल पासवानला अटकही केली आहे. पीडितेवर मुंबईच्या जेजे रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
February 18, 2025 7:05 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
घरी नेतो सांगून प्रियकराने भलतीकडे नेलं, रक्तबंबाळ अवस्थेत आढळली तरुणी, बापाला फोन आला अन्...


