'मूलबाळ होत नाही, करावी लागेल पूजा', म्हणत भोंदू बाबांनी शेतकरी दाम्पत्याचे लुटले 22 लाख!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
मूलबाळ होत नसल्यामुळे त्रस्त असलेल्या गोविंदपूर येथील शेतकरी महेंद्र सांबरे यांच्या दाम्पत्याला नंदीबैलाची जोडी घेऊन आलेल्या दोन भोंदू बाबांनी...
हिंगणघाट (वर्धा) : मूलबाळ होत नसल्यामुळे व्यथित असलेल्या एका शेतकरी दाम्पत्याची भोंदू बाबांनी तब्बल 21 लाख 89 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पूजाविधीच्या नावाखाली पैशांची मागणी करून, हे पैसे न दिल्यास घरात मूल होणार नाही, असे आमिष दाखवून आरोपींनी ही फसवणूक केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू आहे.
नंदीबैलाची जोडी घेऊन गावात आले
गोविंदपूर येथील शेतकरी महेंद्र निवृत्ती सांबरे (वय-37) यांच्याकडे पाच एकर शेती आहे. जून महिन्यात नंदीबैलाची जोडी घेऊन दोन भामटे त्यांच्या गावात आले. सांबरे यांच्या घरी पोहोचल्यावर त्यांच्या पत्नीने त्यांना मूलबाळ होत नसल्याचे सांगितले. याच गोष्टीचा फायदा घेत भामट्यांनी त्यांना विविध आमिष दाखवले. ‘तुमच्या घरात खूप मोठे सोने आहे, त्यामुळेच तुम्हाला मूलबाळ होत नाही. जर पूजा केली तर घरात सोनेही येईल आणि मूलबाळही होईल,’ असे त्यांनी सांगितले.
advertisement
शेती गहाण ठेवून दिले पैसे
नंदीबैलाची जोडी घेऊन आलेल्या या भामट्यांनी मागील दीड महिन्यांपासून सांबरे दाम्पत्याकडून पैसा उकळण्यास सुरुवात केली. सुरुवातीला पूजाविधीसाठी 70 हजार रुपये, नंतर 1 लाख रुपये आणि त्यानंतर तब्बल 21 लाख रुपये मागितले. ही सर्व रक्कम सांबरे यांनी त्यांना दिली. 21 लाख रुपयांची मागणी पूर्ण करण्यासाठी सांबरे यांना आपली पाच एकर शेतीही गहाण ठेवावी लागली.
advertisement
पैसे मिळाल्यानंतरही भामट्यांनी आणखी 36 लाख रुपयांची मागणी केली. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर सांबरे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी आपला मोबाईल नंबर दिला होता, पण फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सांबरे यांनी संपर्क साधला असता तो क्रमांक बंद आढळला. सांबरे यांची एकूण 21 लाख 89 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
advertisement
हे ही वाचा : रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी बिबट्यानं भावाचे लचके तोडले, पाणावलेल्या डोळ्यांसह बहिणीने बांधली अखेरची राखी!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 09, 2025 2:45 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
'मूलबाळ होत नाही, करावी लागेल पूजा', म्हणत भोंदू बाबांनी शेतकरी दाम्पत्याचे लुटले 22 लाख!









