'स्टँडवर भावाची स्कूटी, रक्त सांडलं होतं', आकाशच्या बहिणीने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Jalgaon: जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा शहरात शुक्रवारी सायंकाळी दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी आकाश मोरे नावाच्या २६ वर्षीय तरुणावर अंदाधुंद गोळीबार केला.
विजय वाघमारे, प्रतिनिधी जळगाव: जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा शहरात शुक्रवारी सायंकाळी एक हत्येची घटना उघडकीस आली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी आकाश मोरे नावाच्या २६ वर्षीय तरुणावर अंदाधुंद गोळीबार केला. आरोपींनी तब्बल १२ राऊंड फायर करत आकाशचा बस स्थानक परिसरातच जीव घेतला. वाळू व्यवसायाच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटकही केली आहे. या सगळ्या प्रकरणावर आता आकाशची बहीण प्रियंका हिने संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.
आकाशच्या बहिणीने जबाबात काय सांगितलं?
प्रियंकाने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं की, ४ जून रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास माझा लहान भाऊ आकाश कैलास मोरे घरी जेवन करून बाहेर गेला होता. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता तो घरी परत आला आणि घरात झोपला. त्यावेळी आम्ही सर्वजण घरातच होतो. सायंकाळी सहाच्या सुमारास झोपेतून उठल्यानंतर आकाश स्कुटीवरून एकटाच बाहेर गेला. त्यानंतर सायंकाळी साडे सहाच्या सुमारास आमच्या गल्लीत चर्चा झाली की, माझा भाऊ आकाशला गोळ्या घातल्या आहेत.
advertisement
मी लगेच बसस्टॅन्डकडे पळत गेली. बसस्टॅन्डवर आकाशची स्कुटी पडली होती. बाजुला चप्पल होती. त्याबाजुला रक्तही पडलेले होते. तिथे गेल्यानंतर मला समजलं की, आकाशला सरकारी दवाखान्यात घेवून गेले आहेत. म्हणुन मी पुन्हा सरकारी दवाखाना पाचोरा येथे आले. त्याठिकाणी वार्ड मधील पलंगावर आकाशचे प्रेत ठेवलेले होते. ते मी पाहिले. पण लोकांनी मला जवळ जाऊ दिलं नाही.
advertisement
आमच्या गल्लीत राहणारा प्रथमेश उर्फ गण्या सुनिल लांडगे आणि त्याचा मित्र निलेश उर्फ राव अनिल सोनवणे हे मागील एक महिन्यांपासून माझ्या भावाला खुन्नस देत होते. आणि रागाने पाहत होते. त्या दोघांनी माझ्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत भावाने आपल्याला सांगितलं होतं. असंही प्रियंकाने पोलीस जबाबात सांगितलं.
आकाशने दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ठेवलेली रील ठरली हत्येचं कारण?
advertisement
मयत आकाश मोरे याने दोन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात तो म्हणतो – "शेठ, तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही थेट छातीवर मारतो, रोख ठोक. जिस दिन मारुंगा छाती पे मारुंगा, या स्टेटसनंतर काहीच तासांत हा जीवघेणा हल्ला झाल्याने ही हत्या वर्चस्ववादातून झाली का? याचाही तपास पोलीस करत आहेत.
advertisement
दुचाकीचा वाद?
मयत आकाश हा कुशल सेंट्रिंग कारागीर होता. मात्र गेल्या काही काळापासून तो वाळूचे काम करायचा. वाळू व्यवसायाच्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. आकाश मोरे हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात वडील एक भाऊ एक बहीण असा परिवार आहे. पोलिसांनी आरोपी निलेश सोनवणे आणि एक अल्पवयीन मुलाकडून दुचाकी दोन पिस्तूल दोन मोबाईल जप्त केले आहेत. तसेच दुचाकीच्या वादातून आम्ही गोळीबार केला, अशी प्राथमिक माहिती आरोपींनी पोलिसांना दिल्याची माहिती देखील समोर आली आहे.
Location :
Pachora,Jalgaon,Maharashtra
First Published :
Jul 05, 2025 11:53 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
'स्टँडवर भावाची स्कूटी, रक्त सांडलं होतं', आकाशच्या बहिणीने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग









