भावकीचा वाद लई बेक्कार! सरपंच पदासह पाटीलकीही गेली, सोलापुरात नेमकं काय झालं?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Solapur News: गावाकडे भाऊबंदकीचे वाद सतत होत असतात. पण याच वादातून सोलापूर जिल्ह्यातील वांगीत सरपंच आणि पोलीस पाटीलकीही गमवावी लागलीये.
सोलापूर: आपल्याकडे भाऊबंदकीचे वाद तसे नवीन नाहीत. अनेक गावांत पिढ्यानपिढ्या हे वाद सुरूच असतात. बऱ्याचदा या वादात दोन्ही बाजूंचे नुकसान होत असते. परंतु, तरीही हे वाद सुरूच असतात. असाच काहीसा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील वांगी येथे घडला आहे. वांगी ग्रामपंचायत निवडणुकीत खडाखडे कुटुंबं एकमेकांविरोधात उभी ठाकली आणि या वादात सरपंच आणि पोलीस पाटीलकीही गमवावी लागली.
नेमका वाद काय?
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी ग्रामपंचायतीची निवडणूक 3 वर्षांपूर्वी झाली होती. या निवडणुकीत खडाखडे कुटुंबातील सोनाबाई खडाखडे आणि सीताबाई खडाखडे यांच्यात सामना झाला. त्यात सीताबाई खडाखडे विजयी झाल्या आणि सरपंच झाल्या. आईचा पराभव झाल्याने धरेपा खडाखडे यांनी सीताबाईंनी जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याची तक्रार केली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सीताबाई खडाखडे यांचे पद रद्द ठरवले.
advertisement
पोलीस पाटीलकीही गेली
सीताबाई खडाखडे यांचे पद गेल्याने त्यांचा मुलगा सूरज खडाखडे दुखावला. त्यानेही 14 महिन्यांपूर्वीच पोलीस पाटीलकी मिळवलेल्या धरेपाविरोधात जात प्रमाणपत्र सादर न केल्याचीच तक्रार दिली. प्रांताधिकाऱ्यांनी धरेपाला वेळेत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याची नोटीस बजावली. सुनावणीदरम्यान धरेपाने प्रमाणपत्र सादर न केलेल्या सर्वांनाच अपात्र करण्याची मागणी प्रांताधिकाऱी सुमित शिंदे यांच्याकडे केली. त्यामुळे धरेपा खडाखडे यांच्यासोबत दक्षिण सोलापूर तालुक्यातील मगनोळीच्या पोलीस पाटील अश्विनी घंटे यांनाही पोलीस पाटील पद गमावण्याची वेळ आली.
advertisement
भावकीच्या वादात गेली दोन्ही पदे
दरम्यान, भाऊबंदकीच्या वादात खडाखडे कुटुंबाने एकाचवेळी दोन्ही पदे गमावली. विशेष म्हणजे एकाचवेळी एकाच कारणाने दोन्ही पदे गमावण्याची ही तालुक्यातील पहिलीच घटना घडलीये. दुसरीकडे खडाखडे कुटुंबाच्या वादात इतरांवरही पोलीस पाटील पद गमावण्याची वेळ आलीये.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
March 09, 2025 9:03 AM IST