प्रमोशन की स्ट्रॅटेजी? 'गोंधळ' मूव्ही प्रमोट करण्याऐवजी दिग्दर्शकाचं भलतंच आवाहन, म्हणाले '...तर आमचा ट्रेलर पाहू नका'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Gondhal Movie Trailer : गोंधळ चित्रपटासाठी संतोष डावखर यांनी ट्रेलर न पाहण्याचे आवाहन केले असून किशोर कदम, इशिता देशमुख आदींची स्टारकास्ट आणि महाराष्ट्राच्या परंपरेचा रंग यात दिसणार आहे.
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टी सध्या ग्लॅमर आणि संस्कृतीचा मिलाफ साधणाऱ्या वेगळ्या कथा घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहे. याच परंपरेचा गाभा असलेले कथानक घेऊन बहुचर्चित चित्रपट 'गोंधळ' लवकरच प्रदर्शित होणार आहे. टीझरमुळे या चित्रपटाबद्दल आधीच उत्सुकता निर्माण झाली असताना, आता या चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष डावखर यांनी एक अनोखे आणि धक्कादायक आवाहन केले आहे: "आमचा ट्रेलर बघू नका!"
आजकाल प्रत्येक चित्रपटाच्या ट्रेलरचे आणि टीझरचे जोरदार मार्केटिंग केले जाते. 'ट्रेलरमध्येच पिक्चरचा मोठा भाग' दाखवण्याची सध्याची पद्धत आहे. अशा वेळी 'गोंधळ' चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांना ट्रेलर न पाहण्याची विनंती करून एक उलटा प्रयोग केला आहे, ज्यामुळे त्यांची ही प्रमोशन स्ट्रॅटेजी चर्चेचा विषय बनली आहे.
दिग्दर्शक संतोष डावखर यांनी ही भूमिका घेण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, ट्रेलर न पाहण्याचे आवाहन करून त्यांना चित्रपटाबद्दलचे कुतूहल वाढवायचे आहे.
advertisement
चित्रपटाचा थ्रिल कमी होण्याची भीती
संतोष डावखर म्हणतात, "'गोंधळ'ची कथा, पात्रे आणि कलाकार अतिशय रंजक आहेत. यातील प्रत्येक पात्र हळूहळू एक गूढ उलगडत जाते. त्यामुळे प्रेक्षकांनी ट्रेलरपेक्षा संपूर्ण चित्रपट थेट सिनेमागृहात बसून पाहावा, अशी आमची इच्छा आहे. जर तुम्ही ट्रेलर पाहिला, तर चित्रपटातील थ्रिल थोडा २-३ टक्के कमी होऊ शकतो."
advertisement
ते पुढे सांगतात, "चित्रपट पाहिल्यानंतरच या कथेचा गाभा, भावना आणि महाराष्ट्राच्या परंपरेचा खरा रंग प्रेक्षकांना जाणवेल. ज्यांना चित्रपटाबद्दल काही शंका असेल, त्यांनीच फक्त ट्रेलर पाहावा." डावखर यांनी असाही दावा केला आहे की, चित्रपटात काही गोष्टी अशा आहेत, ज्या ७० MM पटलावर प्रदर्शित होणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये प्रथमच दिसतील.
advertisement
तगडी स्टारकास्ट आणि दमदार टीम
'डावखर फिल्म्स' प्रस्तुत 'गोंधळ'ची कथा, पटकथा आणि संवाद संतोष डावखर यांनी लिहिले असून सहनिर्मात्या दीक्षा डावखर आहेत. चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे. दिग्दर्शकाच्या या अनोख्या आवाहनामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढेल की कमी होईल, हे 'गोंधळ' प्रदर्शित झाल्यावरच कळेल!
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 28, 2025 3:09 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
प्रमोशन की स्ट्रॅटेजी? 'गोंधळ' मूव्ही प्रमोट करण्याऐवजी दिग्दर्शकाचं भलतंच आवाहन, म्हणाले '...तर आमचा ट्रेलर पाहू नका'


