वेटर ते ‘सिंधूताई....’ मालिका! कोल्हापूरच्या अमितचा ‘लय भारी’ प्रवास माहिती आहे?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
मराठी मालिकाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या कलाकारानं वेटर म्हणूनही काम केलंय.
मुंबई, 4 सप्टेंबर : रांगोळी हा आता फक्त महिलांपुरता मर्यादीत कला प्रकार राहिलेला नाही. पुरुषही रांगोळीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कौशल्य दाखवत आहेत. वाळू किंवा रेतीचा वापर करून काढलेल्या कलात्मक रांगोळीला सॅंड आर्ट म्हणतात. बऱ्याच जणांना हे सॅंड आर्ट कसे करतात, हे देखील माहीत नाही आहे. मात्र कोल्हापुरचा एक कलाकार स्वतःची शिक्षकी पेशाची नोकरी सांभाळत ही आपली कला जपत आहे आणि जोपासत देखील आहे.
अमित माळकरी असं या शिक्षकाचं नाव आहे. अमित मुळचा कर्नाटकातला पण सध्या कोल्हापूरच्या वसगडेमध्ये राहणारा तरुण आहे. शालेय शिक्षण पूर्ण करून अमितने कोल्हापुरात विवेकानंद कॉलेज या ठिकाणी त्याचे कला शाखेच्या पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तर पुढे कलानिकेतन महाविद्यालयातून कलाशिक्षकाचेही शिक्षण घेतले. कोल्हापुरातील आळते येथील सेंट पॉल्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये तो सध्या कलाशिक्षक म्हणून अमित काम करतो. त्यानं हेच काम सांभाळत त्याची सॅंड आर्टची कला जपलीय.
advertisement
काय आहे सॅंड आर्ट ?
एखादी कथा तयार करण्यासाठी वाळूचा फेरफार करणे म्हणजेच हे सॅंड आर्ट. यामध्ये वाळूचा वापर करून अनेक चित्रांची मालिका तयार केली जाते. सुरुवातीला खालच्या बाजूने लाईट असलेल्या एका पृष्ठभागावर वाळू टाकली जाते. नंतर हाताने त्या वाळूमध्ये रेषा आणि आकृत्या काढून अनेक चित्रे साकारली जातात. सँड आर्टिस्ट ही कला सादर करण्यासाठी जो पृष्ठभाग वापरतो त्यालाच लाइटबॉक्स म्हणतात.
advertisement
कशी लागली गोडी ?
बऱ्याचदा दुसऱ्या एखाद्या कलाकाराची कला पाहूनच आपल्याला ती कला अवगत करुन घेण्याची आवड निर्माण होत असते. अमितला सॅंड आर्टची आवड याच पद्धतीनं आवड लागली होती. 'मराठी पाऊल पडते पुढे' या कार्यक्रमाच्या ऑडिशन्सवेळी 2011 साली मला एक सॅंड आर्टिस्ट भेटला होता. त्याची कला पाहून कोल्हापूर सारख्या कलानगरीमध्ये अशी कला जोपासली गेली पाहिजे, ही भावना निर्माण झाली. त्याच प्रेरणेतून पुढे मला यामधील आवड वाढू लागली, असे अमितने सांगितले.
advertisement
शिक्षणासाठी कष्ट
अमित शिक्षणासाठी कोल्हापुरात त्याच्या मामाकडे राहात होता. स्वत:चं आयुष्य घडवताना शिक्षण घेत घेतच त्याने कामही करायला सुरुवात केली होती. कलानिकेतनमध्ये शिक्षण घेताना आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी अमितने एका हॉटेलमध्ये वेटरचे काम देखील केले आहे.
सोशल मीडियाचा योग्य वापर
आजकाल सोशल मीडियाचा वापर योग्य कामासाठी होत नाही. पण मी सोशल मीडियाच्या माध्यमातूनच माझ्या कलेसाठी मार्गदर्शन मिळवत आलेलो आहे. या कलेसाठी माझ्या माहितीत कोणी विशेष मार्गदर्शक नसल्याने यूट्यूबवर दिग्गज सॅंड आर्टिस्टचे व्हिडिओ पाहिले. त्यांच्या सारखेच न करता त्यांच्या कलेतून वेगळे विषय घेऊन ते मी मांडण्याचा प्रयत्न करत गेलो, असेही अमितनं सांगितलं.
advertisement
सॅंड आर्ट ही कला अद्याप सर्व परिचित नसली तरी अमितने त्याची कला विविध माध्यमांतून सर्वांसमोर आणली आहे. त्यामध्ये सुरुवातीला कॉलेजमध्ये असताना विविध स्पर्धा, कोल्हापुरातील प्रसिद्ध महोत्सवात त्याने त्याची कला सादर केली. पुढे टीव्ही चॅनलमध्ये देखील त्याला संधी मिळाल्या. संगीत सम्राट या शो वेळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सिरियालच्या प्रोमोसाठी अमितने सॅंड आर्ट केले आहे. तर नुकत्याच सुरू झालेल्या सिंधुताई सकपाळ यांच्या एका मराठी सिरियलच्या शीर्षक गीतासाठी देखील टायटल ट्रॅक सॅंड आर्ट अमितने केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूरच्या अमितची ही कला सर्वांना पाहायला मिळतीय.
advertisement
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
September 04, 2023 3:09 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
वेटर ते ‘सिंधूताई....’ मालिका! कोल्हापूरच्या अमितचा ‘लय भारी’ प्रवास माहिती आहे?