Sharad Pawar : शरद पवारांचे सर्व दौरे रद्द; अमोल कोल्हेंकडून पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांचे आजचे सर्व दौरे आणि कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
अहमदनगर, साहेबराव कोकणे, प्रतिनिधी : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना रविवारी अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांचे आजचे सर्व दौरे आणि कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे. 'शरद पवार यांना उन्हाचा त्रास झाला आहे, ते दिवसाला तीन ते चार सभा घेत असतात. सहाजिकच वयाचा विचार करता त्याचा त्यांच्या प्रकृतीवर थोडासा परिणाम झाला आहे. डॉक्टरांनी त्यांना एक दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे,' असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. 'माझ्या मतदारसंघात शरद पवार यांची सभा रद्द झाल्यामुळे विरोधकांनी खुश होण्याचं कारण नाही. मुळातच ते डमी उमेदवार आहेत. ते अर्ज मागे घेण्याच्या तयारीत असतील कारण त्यांनी मला आवाहन दिलं होतं. पंधरा वर्ष शिरूर मतदारसंघात त्यांना जनतेने निवडून दिलं होतं, तरीही त्यांची कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे. याचे पुरावे त्यांनी मागितले होते मी ते पुरावे दिले आहेत. त्यांच्या कंपनीच्या वेबसाईटवर पाणबुडीचं चित्र आहे, यावरून आपण समजून घेतलं पाहिजे. शरद पवार यांची सभा रद्द झाल्यामुळे त्यांना सावरण्यासाठी आणि अर्ज मागविण्यासाठी वेळ मिळेल' असा हल्लाबोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्यावर केला आहे.
advertisement
अमोल कोल्हे यांनी कांद्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 'केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली असल्याची घोषणा केली आहे. मात्र ही घोषणा फसवी आहे. 40 टक्के निर्यात शुल्क आहे. यामुळे काद्यांचा भाव इतर देशांपेक्षा जास्त राहील, हा भाव 65 ते 70 रुपये किलोच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर देशातील व्यापारी हा कांदा घेणार नसल्याचं' कोल्हे यांनी म्हटलं आहे.
Location :
Ahmadnagar,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
May 06, 2024 8:30 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Sharad Pawar : शरद पवारांचे सर्व दौरे रद्द; अमोल कोल्हेंकडून पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट


