वाशीप्रमाणेच आझाद मैदानातही हातात GR दिला, जरांगेंच्या उपोषण सोडण्यावर अजितदादांची पहिली प्रतिक्रिया
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Ajit Pawar: गतसाली जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी स्वत: एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन शरद पवार यांच्यानंतरचा मराठा नेता म्हणून ओळख प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी मात्र जरांगे पाटील यांच्या आंदोलनावेळी शिंदे यांच्या गैरहजेरीची सर्वांत जास्त चर्चा झाली.
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांबाबत महाराष्ट्र शासनाने पहिल्या दिवसापासून सकारात्मक आणि संवेदनशील भूमिका घेतली होती. आंदोलनकर्त्यांच्या भावनांचा सन्मान राखत आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी शासनाने सतत प्रयत्न केले. त्या अनुषंगाने मंत्रिमंडळ उपसमितीच्या शिफारशींवर तातडीने निर्णय घेऊन आज शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
इतर मागास वर्गातून अर्थात ओबीसीमधूनच मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले उपोषण सरकारने सहा मागण्या मान्य केल्यानंतर जरांगे पाटील यांनी मागे घेतले. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले. वाशीच्या गुलालाची पुनरावृत्ती झाल्यास पुन्हा विखे पाटलांना जाब विचारण्यासाठी त्यांच्या घरी जाईन आणि अभ्यासकांनी पुन्हा काही शंका उपस्थित केली तर शासनाने शुद्धीपत्रक काढावे, अशी विनंती जरांगे यांनी केली. विखे पाटलांनी विनंती मान्य करताच आपण जिंकलो म्हणत लढ्याचा विजय जरांगे पाटील यांनी घोषित केला. जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थगितीनंतर अजित पवार यांनी समाज माध्यमांद्वारे शासनाने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली.
advertisement
आम्ही तिघांने सातत्याने चर्चा केली, शासनाने निर्णय घेतला म्हणूनच....
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी स्वतः, आम्ही तिघांनी मिळून याबाबत सविस्तर चर्चा करून योग्य निर्णय होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. शासनाच्या या ठोस आणि सकारात्मक भूमिकेला प्रतिसाद देत मनोज जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या भावना आणि मराठा समाजाच्या अपेक्षांना न्याय देण्याचा प्रयत्न शासनाने केल्याचे अजित पवार म्हणाले.
advertisement
समाज हिताचे प्रश्न संवाद आणि ठोस निर्णय प्रक्रियेतूनच मार्गी लावले जातील. मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन वचनबद्ध आहे. तसेच मराठा समाजासह संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असा विश्वास सरकारच्या अजित पवार यांनी दिला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 02, 2025 8:46 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वाशीप्रमाणेच आझाद मैदानातही हातात GR दिला, जरांगेंच्या उपोषण सोडण्यावर अजितदादांची पहिली प्रतिक्रिया