जनता दरबाराच्या आडून थेट महापालिकेचा प्रचार, पुण्यात भाजपवर कुरघोडींना सुरुवात, मुरब्बी अजितदादांचे डावपेच
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Ajit Pawar: शहरावरील गमावलेले वर्चस्व पुन्हा मिळविण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली आहे. त्याचाच भाग म्हणून महापालिका निवडणुकीच्या आधी जनसंवाद कार्यक्रम घेऊन आतापासून मतदार राजापर्यंत पोहोचण्याचे त्यांचे नियोजन आहे.
मुंबई : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पिंपरी येथे शनिवारी जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हडपसरमधील जनसंवाद कार्यक्रमानंतर त्यांनी पिंपरीतही जनसंवाद कार्यक्रम घेऊन महापालिका निवडणुकांच्या प्रचाराला अप्रत्यक्षपणे सुरुवात केल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, विविध विभागाचे प्रमुख अधिकारी आणि पोलीस प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारीही राष्ट्रवादीच्या मंचावर होते. अजित पवार यांच्या जनसंवाद कार्यक्रमाला सामान्य लोकांची मोठी गर्दी झाली होती. शासनाचा कार्यक्रम म्हटल्यावर सत्तेतील नेतेमंडळींची उपस्थिती अपेक्षित होती. मात्र जनसंवादाला केवळ राष्ट्रवादीचेच पदाधिकारी होते हे विशेष! भाजपच्या नेते मंडळींनी मात्र अजित पवार यांच्या जनसंवाद कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. तसेच अजित पवार यांच्या अप्रत्यक्षपणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारावर भाजपचे नेते मंडळी बोलायला देखील तयार नव्हते!
महापालिका निवडणुका अगदी तीन महिन्यांवर येऊन ठेपल्याने सगळ्याच राजकीय पक्षांनी आपापल्या पद्धतीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. अजित पवार आणि पिंपरी चिंचवडचे खास नाते आहे. त्यांच्या संकल्पनेतूनच शहरात विविध गोष्टी नावारुपाला आल्या, हे नाकारून चालणार नाही. २०१७ पर्यंत अजित पवार यांचे शहरावर एकहाती वर्चस्व होते. मात्र तत्कालिन आणि आताचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवील यांनी अतिशय सूक्ष्म रणनीती आखून अजित पवार यांचे वर्चस्व ठरवून मोडित काढले. अजित पवार यांच्याच एकेकाळच्या सहकाऱ्यांना भाजपमध्ये आणून फडणवीस यांनी आव्हान उभे केले. शहरावरील गमावलेले वर्चस्व पुन्हा मिळविण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली आहे. त्याचाच भाग म्हणून महापालिका निवडणुकीच्या आधी जनसंवाद कार्यक्रम घेऊन आतापासून मतदार राजापर्यंत पोहोचण्याचे त्यांचे नियोजन आहे.
advertisement
उत्साहातून घडतोय जनसंवाद.. जनसंवादातून घट्ट होतंय नातं.. प्रश्नांची उकल, समस्यांचं निरसन.. राष्ट्रवादीला जनसामान्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद..!#जनसंवाद
📍पिंपरी pic.twitter.com/nKjkKB79Y0
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 20, 2025
मी राज्याचा उपमुख्यमंत्री असल्याने शासकीय यंत्रणा माझ्याबरोबर, अजित पवार यांचे उत्तर
advertisement
मी राज्याचा उपमुख्यमंत्री असल्याने शासकीय यंत्रणा माझ्याबरोबर असते. यातून महापालिकेचा प्रचार वगैरे करतोय असे नाही. मी कामाचा माणूस आहे. लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, यासाठी माझा नेहमी प्रयत्न असतो, असे प्रत्युत्तर शासकीय यंत्रणा सोबत असण्यावरून होत असलेल्या टीकेवर अजित पवार यांनी दिले.
अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडवर वर्चस्व कसे मिळवले?
अजित पवार यांच्या नेतृत्वातच २०१७ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका निवडणूक लढला. मात्र शहराचा चौफेर विकास केल्याचा दावा करूनही राष्ट्रवादीच्या वाट्याला निराशा आली. अजित पवार यांनाही महापालिका हातून गेल्याचे खूप दु:ख झाले. अनेकदा त्यांनी भाषणांतून पिंपरी चिंचवड हातून गेल्याची खंत व्यक्त केली. मात्र मागचे सगळे विसरून तीन चार महिन्यांवर आलेल्या महापालिका निवडणुकीत विजय मिळविण्याकरिता अजित पवार यांनी जोरकसपणे प्रयत्न सुरू केले आहेत.
advertisement
जनसंवाद हा केवळ जनतेशी संवाद साधण्याचा कार्यक्रम नसून, तो जनतेच्या अडचणी समजून घेऊन त्यावर त्वरित तोडगा काढण्याचा सुलभ उपक्रम आहे. लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यातला हा थेट संवादच खऱ्या अर्थानं लोकशाही बळकट करतो.#जनसंवाद
📍पिंपरी pic.twitter.com/M7k375D5we
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 20, 2025
advertisement
पिंपरी चिंचवड हे शहर वसविण्यात, त्याचा विकास करण्यात अजित पवार यांचा महत्त्वाचा सहभाग राहिलेला आहे. अगदी १९९१ पासून अजित पवार यांचे पिंपरी चिंचवड शहरावर बारीक लक्ष होते. सुरुवातीच्या काळात भोसरीचे लांडगे, पिंपळे सौदागरचे काटे, भोसरीचे लांडे, फुगेवाडीचे फुगे तसेच चिंचवडचे चांदेरे अशा गाववाल्या विविध सहकाऱ्यांना संधी देऊन अजित पवार यांनी हळूहळू पिंपरी चिंचवड शहरावर पकड मिळवली. पुण्याचे पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे होते. त्यामुळे विकासनिधीच्या देवघेवीमुळे अनेक नवे सहकारी देखील अजित पवार यांना जोडले गेले. अगदी काही वर्षातच अजित पवार यांनी शहर आणि महापालिकेवर एकहाती वर्चस्व मिळवले.
advertisement
देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचे वर्चस्व कसे मोडून काढले?
परंतु २०१३ च्या सुमारास केंद्रात आणि राज्यात अनुक्रमे नरेंद्र मोदी-देवेंद्र फडणवीस या जोडीचा उदय झाल्यानंतर अजित पवार यांच्या वर्चस्वाला शह देण्याचे काम फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. हळहळू अजित पवार यांना त्यांचे जीवाभावाचे सहकारी सोडून जाऊ लागले. नंतर मतदारांनी भाजपच्या विकासाच्या नाऱ्याकडे पाहून कमळाला साथ दिली. त्यामुळे २०१७ ला अजित पवार यांना पुणे-पिंपरी चिंचवड महापालिका गमवावी लागली. परंतु ८ वर्षानंतर मागचे झालेले सगळे विसरून अजित पवार हे पुन्हा महापालिका ताब्यात घेण्यासाठी सरसावले आहेत. विशेष म्हणजे महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजपवर कुरघोडी करून जास्तीचे नगरसेवक निवडून आणण्याचे त्यांचे यंदा लक्ष्य आहे.
advertisement
पिंपरी चिंचवडच्या जनसंवादात १,८०० तक्रारींचे तत्काळ निराकरण
हडपसरप्रमाणेच पिंपरी येथील जनसंवादातही नागरिक, विविध शासकीय विभाग आणि लोकप्रतिनिधी एकत्र आले. या उपक्रमासाठी डिजिटल हेल्पलाईन, व्हॉट्सअॅप चॅटबॉट्स, डिजिटल किऑस्कसारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरात आणले गेले, ज्यामुळे पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व निश्चित झाले. आजच्या कार्यक्रमात २५ पेक्षा जास्त शासकीय विभागांनी सहभाग घेतला. एकूण ४,८०० तक्रारींची नोंद झाली असून त्यापैकी सुमारे १,८०० तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात आले. बहुतांश तक्रारी पाणीपुरवठा, स्वच्छता आणि वाहतूक यांच्याशी संबंधित होत्या, असे अजित पवार यांनी सांगितले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 20, 2025 9:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जनता दरबाराच्या आडून थेट महापालिकेचा प्रचार, पुण्यात भाजपवर कुरघोडींना सुरुवात, मुरब्बी अजितदादांचे डावपेच