राष्ट्रवादीत रुपाली विरुद्ध रुपाली वाद थांबेना, रुपाली ठोंबरेंनी आता पक्षाकडेच मागितला खुलासा
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठोंबरे पाटील यांच्यातील वाद शमण्याचं काही नाव घेत नाहीये.
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठोंबरे पाटील यांच्यातील वाद शमण्याचं काही नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर असंवेदनशील वक्तव्य केलं होतं. यावरून संपूर्ण राज्यभर पडसाद उमटले होते. यावरून अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनीही रुपाली चाकणकरांवर हल्लाबोल केला होता. त्यांनी चाकणकरांवर टीका करत धरणे आंदोलन देखील केलं होतं.
एकाच पक्षातील दोन महिला नेत्यांमध्ये सुरू झालेल्या वादावर अजित पवारांनी देखील बोलणं टाळलं होतं. मात्र काही दिवसांपूर्वी पक्षाकडून रुपाली ठोंबरे पाटील यांना पत्र पाठवून खुलासा मागितला होता. यावरून आता रूपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षालाच खुलासा मागितला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
पक्षाकडून आलेल्या पत्राला उत्तर देताना रूपाली ठोंबरे यांनी पक्षालाच सवाल विचारला आहे. मी केलेलं नेमकं कोणतं वक्तव्य पक्षाची शिस्तभंग करणारं आहे, याची माहिती मला द्यावी, अशी मागणी रुपाली ठोंबरे यांनी पक्षाकडे केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी (रुपाली चाकणकर) जे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर पक्षाला देखील रोषाला सामोरे जावं लागलं होतं. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी अजित पवारांनी देखील रूपाली चाकणकर यांच्या विधानाचं समर्थन केलं नव्हतं. अशात अजित पवारांची बाजू मांडणं हे प्रवक्त्याचं काम होतं आणि तेच मी केलं, असं रुपाली ठोंबरे यांनी पत्रात म्हटलं आहे.
advertisement
रुपाली ठोंबरे पाटील यांनी स्वत:च्या पक्षाकडेच खुलासा मागितल्याने आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावर पक्ष नेतृत्वाकडून कसा तोडगा काढला जातो, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मंगळवारी रुपाली ठोंबरे स्वत: अजित पवारांच्या भेटीला गेल्या होत्या. या भेटीत त्यांना समज दिल्याची माहिती आहे. असं असूनही रुपाली ठोंबरे यांनी आपल्याच पक्षाकडे खुलासा मागितल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 13, 2025 2:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राष्ट्रवादीत रुपाली विरुद्ध रुपाली वाद थांबेना, रुपाली ठोंबरेंनी आता पक्षाकडेच मागितला खुलासा


