'सत्या'च्या मार्गात गुन्हे? बाळा नांदगावकरांसह सहा जणांवर गुन्हा, भाजपच्या आंदोलनाचे काय? विरोधकांचा हल्लाबोल
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात सत्याचा मोर्चा काढून विरोधकांनी ताकद दाखवून दिली. मात्र मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती. बाळा नांदगावकर यांच्यासह सहा जणांविरुद्ध आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संतोष गोरे, प्रतिनिधी, मुंबई: सत्याचा मोर्चावरून सुरू झालेलं राजकारण संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. मविआ आणि मनसेने काढलेल्या सत्याचा मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर मग भाजपच्या मूक आंदोलनावर गुन्हा का दाखल केला नाही? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय.
सत्याचा मोर्चा राज्यभरात गाजतोय. शनिवारी ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात विरोधकांनी त्यांची ताकद दाखवून दिली. मात्र मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती. बाळा नांदगावकर यांच्यासह सहा जणांविरुद्ध आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर बेकायदेशीर सभा आयोजित केल्याबद्दल आणि प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळा नांदगावकर यांच्यासह कुलाबा विभाग प्रमुख बबन महाडिक, शिवसेना ठाकरे गटाचे जयवंत नाईक, बबन घरत आणि मनसेचे अरविंद गावडे यांच्यावर आझाद मैदानात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
दुसरीकडे शनिवारीच सत्याचा मोर्चाला भाजपनं मूक आंदोलनाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं. तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून भाजप नेत्यांनी बाबुलनाथ मंदिर ते गिरगाव चौपाटी या मार्गावरून मूक आंदोलन केलं. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला.
मूक आंदोलन करणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर गुन्हा का दाखल केला नाही? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. विरोधकांनी मूक आंदोलनावर टीका केल्यानं सत्ताधाऱ्यांनीही जशास तसं उत्तर दिलं. भाजपच्या आंदोलनामुळे मुंबईकर वेठीस धरले गेले नाही, असा मुद्दा भाजपकडून उपस्थित करण्यात आला.
advertisement
मूक आंदोलन आणि सत्याचा मोर्चावरून राज्यात नवा संघर्ष सुरू झालाय. सत्याचा मोर्चामध्ये ठाकरे बंधूंनी दुबार मतदार आणि मत चोरी करणाऱ्यांना फोडून काढण्याची भाषा केली होती. चुकीच्या पद्धतीने मतदार वाढवले जात आहेत, असा आरोप विरोधकांनी केला होता. एकंदरीतच मत चोरीनंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गुन्हा दाखल करण्याच्या मुद्यावरून सुरू झालेली खणाखणी पुढील काही दिवस सुरू राहण्याची चिन्हं दिसत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 02, 2025 10:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'सत्या'च्या मार्गात गुन्हे? बाळा नांदगावकरांसह सहा जणांवर गुन्हा, भाजपच्या आंदोलनाचे काय? विरोधकांचा हल्लाबोल


