Beed: तरुणाला फरपटत नेऊन अपहरण करणाऱ्या टोळीला जामीन, नातेवाईक आक्रमक; SP ऑफिसमध्ये राडा
- Published by:Prachi Amale
- Reported by:SURESH JADHAV
Last Updated:
गंभीर प्रकरणातील आरोपींना अवघ्या काही तासात जामीन मंजूर झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे
बीड : बीड शहरातील चऱ्हाटा फाटा परिसरातून शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास 10 ते 12 जणांनी लाकडी दांड्याने बेदम मारहाण करत नागनाथ नन्नवरे या व्यक्तीचं अपहरण केलं होतं. यानंतर धाराशिव जिल्ह्यातील भुम तालुक्यात येणाऱ्या टोकवाडी परिसरात नेऊन डांबून ठेवलं. पोलिसांनी काल डांबून ठेवलेल्या ठिकाणी पोहचून 10 आरोपींसह दोन चारचाकी गाड्या ताब्यात घेतल्या होत्या. यानंतर त्यांना काल सायंकाळी न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने सर्व आरोपींना जामीन मंजूर केला. गंभीर प्रकरणातील आरोपींना अवघ्या काही तासात जामीन मंजूर झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तर बीड ग्रामीण पोलिसांमध्ये आरोपींच्या अटकेच्या प्रक्रियेसह इतर प्रक्रिया पुर्ण करण्यावरुन एकमेकांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती आहे. तर एका अधिकाऱ्याने एका कर्मचाऱ्याला शिवीगाळ देखील केल्याची माहिती आहे.
नागनाथ नन्नवरे या व्यक्तीस दहा ते बारा जणांच्या टोळक्याने लाठ्या-काठ्यांनी अमानुष मारहाण करत अपहरण केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण थरारक घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून परिसरात ती व्हिडीओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. दरम्यान आरोपींना काही तासातच जामीन मिळाल्याने अपहरण झालेल्या नागनाथ नन्नवरेंसह त्यांचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत. त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतलं आहे.
advertisement
नेमकं घडलं काय?
बीड शहराजवळील चराटा फाटा परिसरात शुक्रवारी एका तरुणाला 10-15 जणांनी बेदम मारहाण केली. टोळक्यानं रस्त्यात तरुणाला अडवून हॉकी स्टिकने मारहाण केली. त्यानंतर महादेव नन्नवरे याला रस्त्यावर ओढत नेऊन एका जीपमध्ये टाकलं. त्यानंतर त्याचं अपहरण केल्याचा प्रकार घडला. हा सगळा प्रकार तिथे उपस्थिती काही महिलांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे. व्हिडीओमध्ये महिला ओरडत आणि रडताना दिसत आहेत. दरम्यान, गेल्या काही काळात बीडमधील गुन्हेगारी सत्र सुरू आहे. दोन महिन्यांपूर्वी माजलगाव तालुक्यातील उपसरपंचाला रस्त्यावर अडवून गुंडांनी लोखंडी पाईप, कोयत्या आणि दगडाने अमानुष मारहाण केली होती.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 14, 2025 5:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed: तरुणाला फरपटत नेऊन अपहरण करणाऱ्या टोळीला जामीन, नातेवाईक आक्रमक; SP ऑफिसमध्ये राडा