पाहुणे अन् भिकाऱ्यांच्या वेश्यात यायचे अन्.., बीडमध्ये दहशत, पण असा फसला 'सिसोदिया गँग'चा डाव!
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Beed News: बीडमध्ये पाहुणे आणि भिकारी बनून दहशत माजवणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा डाव फसला आहे. लहान मुलांचाही वापर होत होता.
बीड: लग्न समारंभाच्या गर्दीचा गैरफायदा घेत नागरिकांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अखेर स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. पाहुणे किंवा भिकाऱ्यांच्या वेशात लग्नात शिरून दागिने चोरी करणे, तसेच नागरिकांचे लक्ष विचलित करून पाकीटमारी करणे ही या टोळीची खास पद्धत होती. मध्यप्रदेशातून आलेल्या या टोळीने बीड, अंबाजोगाई, गेवराईसह परिसरात काही काळ दहशत निर्माण केली होती.
या कारवाईत बादल कृष्णा सिसोदिया (24), काला उर्फ ऋतिक महेश सिसोदिया (29), दिलीप सिसोदिया (29) आणि जस्वंत मनिलाल सिसोदिया (27) या चौघांना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातील पाचोर तालुक्यातील गुलखेडी येथील रहिवासी आहेत. हे आरोपी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने गुन्हे करत होते. लग्न समारंभात गर्दीचा फायदा घेत महिलांच्या पर्स, दागिने लंपास करणे, बँकेतून पैसे काढणाऱ्या नागरिकांवर पाळत ठेवून त्यांच्या बॅगा हिसकावणे, तर कधी अंगावर टोमॅटो सॉस टाकून गोंधळ उडवत पैसे चोरणे, असे प्रकार ते करत होते.
advertisement
असा फसला डाव
12 डिसेंबर रोजी ही टोळी केज तालुक्यात चोरीच्या दुचाकीवरून एका बॅग लुटीच्या उद्देशाने दाखल झाली होती. मात्र, त्यांचा डाव फसल्याने त्यांनी बीडकडे पळ काढला. दोन विना क्रमांकाच्या दुचाकींवरून पळणाऱ्या या संशयितांकडे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे लक्ष गेले. पोलिसांनी तत्काळ पाठलाग सुरू केला. यामध्ये दोघांना घटनास्थळीच पकडण्यात आले, तर उर्वरित दोघांना मस्साजोग परिसरात पकडण्यात यश आले. या कारवाईत सामान्य नागरिकांनीही पोलिसांना मदत केली.
advertisement
लहान मुलांचाही वापर
पोलिसांनी आरोपींकडून दोन चोरीच्या दुचाकी, मोबाईल फोनसह सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीच्या अटकेमुळे बीड जिल्ह्यातील तसेच इतर भागांतील अनेक चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे या टोळीमध्ये लहान मुलांचाही वापर केला जात होता. लग्न समारंभात नवरीच्या खोलीत किंवा गर्दीत महिलांच्या पर्स चोरण्याचे काम ही मुले करत असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.
advertisement
ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, उपनिरीक्षक महेश विघ्ने, बप्पासाहेब घोडके, राजू पठाण, महेश जोगदंड, युनूस बागवान, भागवत शेलार, गणेश मराडे आदींच्या पथकाने केली. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत आणि अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. दरम्यान, या टोळीच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असून, नंदुरबारसह इतर जिल्ह्यांतील गुन्ह्यांचा तपासही वेगाने सुरू आहे.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Dec 16, 2025 10:42 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
पाहुणे अन् भिकाऱ्यांच्या वेश्यात यायचे अन्.., बीडमध्ये दहशत, पण असा फसला 'सिसोदिया गँग'चा डाव!







