मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, गडचिरोलीत नवेगाव मोर ते सुरजागडदरम्यान 4 पदरी महामार्गाला मान्यता
- Published by:Sachin S
Last Updated:
गडचिरोलीतील नवेगाव मोर–सुरजागड चार पदरी सिमेंट काँक्रिट महामार्गाच्या सुधारित आखणीस पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई इथं मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये गडचिरोलीतील नवेगाव मोर–सुरजागड चार पदरी सिमेंट काँक्रिट महामार्गाच्या सुधारित आखणीस पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसंच, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळदरम्यान मेट्रो मार्गिका क्रमांक 8 ची 35 किमी जोडणी, नाशिक शहराचा 66 किमी परिक्रमा मार्गालाही मंजुरी दिली आहे.
पायाभूत सुविधा प्रकल्पाला आवश्यक असलेले भूसंपादन आणि सर्व प्रकारच्या परवानग्या प्राप्त करून घेण्याची कार्यवाही प्रकल्प सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. तसेच कुठलाही पायाभूत सुविधा प्रकल्प भूसंपादनानंतर पुढील 3 वर्षांमध्ये पूर्ण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. तसेच, नागपूर ते गोंदिया, भंडारा ते गडचिरोली या समृद्धी महामार्गाच्या विस्तारित कामांना गती देण्याचे निर्देश दिले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "प्रकल्प विहित कालमर्यादेत पूर्ण झाल्यास कंत्राटदाराला प्रोत्साहन मूल्य आणि विहित कालावधीपेक्षा जास्त वेळ लागल्यास दंडाची व्यवस्था असलेली 'ऑटो मोड' वरील यंत्रणा विकसित करावी. गडचिरोली जिल्ह्यातील महामार्गाचे काम करीत असताना रस्त्याच्या बाजूला गॅस वाहिनीसाठी जागा उपलब्ध असल्याची खात्री करावी. भविष्यात सुरजागडपर्यंत गॅस वाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी आतापासून महामार्गाच्या बाजूला जागेची तरतूद करण्यात यावी"
advertisement
मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झाली घोषणा?
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रो लाईन 8 द्वारे जोडण्यास मान्यता
मेट्रो मार्गाची एकूण लांबी 35 किमी, भूमिगत मार्ग 9.25 किमी, उन्नत मार्ग 24.636 किमी, एकूण 20 स्थानके, 6 स्थानके भूमिगत, 14 स्थानके उन्नत
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 स्थानक ते घाटकोपर (पूर्व) पर्यंत भूमिगत स्थानके
advertisement
घाटकोपर (पश्चिम) स्थानक ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 स्थानकांपर्यंत उन्नत स्थानके, 2 स्थानकांमधील सरासरी अंतर 1.9 किमी
30.7 हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता, भूसंपादनासाठी 388 कोटींचा खर्च अपेक्षित
प्रकल्प पूर्ण होण्यासाठी एकूण 22,862 कोटींचा खर्च अपेक्षित
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिक्रमा मार्गाची निर्मिती, मार्गाची एकूण लांबी 66.15 किमी, या प्रकल्पासाठी एकूण 3954 कोटींच्या खर्चास मान्यता
advertisement
प्रकल्पाला विशेष बाब म्हणून 50% भूसंपादन झाल्यास कार्यादेश देण्याचा निर्णय
गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोरे-कोनसरी-मूळचेरा-हेदरी-सुरजागड महामार्गाच्या सुधारित 85.76 किमी लांबीस मान्यता. 4 पदरी सिमेंट काँक्रीटचा महामार्ग
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 11:56 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, गडचिरोलीत नवेगाव मोर ते सुरजागडदरम्यान 4 पदरी महामार्गाला मान्यता










