advertisement

डीलमध्ये कोणाचा जास्त फायदा? ना भारत ना युरोपियन युनियन; सर्वात मोठा Profit तुम्हाला होणार, कसा ते समजून घ्या

Last Updated:

India-Europe Trade Deal Explainer: भारत आणि युरोपियन युनियनमधील ऐतिहासिक मुक्त व्यापार करारामुळे जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये थेट आर्थिक भागीदारी सुरू झाली आहे. या करारातून भारताच्या निर्यात, शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्राला अभूतपूर्व संधी मिळणार असून युरोपियन बाजार भारतासाठी अधिक खुला होणार आहे.

News18
News18
भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यातील मुक्त व्यापार करार (FTA) पूर्ण झाला असून, या ऐतिहासिक व्यापार करारामुळे दोन्ही बाजूंना मोठा फायदा होणार आहे. भारतासाठी यामुळे 45 कोटी लोकसंख्येचा युरोपियन बाजार खुला झाला आहे, तर युरोपसाठी भारताच्या रूपाने जगातील दुसरी सर्वात मोठी उपभोगता बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. या करारामुळे जगातील चौथी क्रमांकाची (भारत) आणि दुसरी क्रमांकाची (EU) सर्वात मोठी अर्थव्यवस्था थेट एकमेकांशी जोडली गेली आहे. या डीलमुळे नेमका कोणाला किती फायदा होणार, कोणत्या क्षेत्रांना चालना मिळणार आणि भविष्यातील परिणाम काय असतील तसेच सर्व सामान्य व्यक्तीला याचा कसा फायदा होईल हे जाणून घेऊयात.
भारत आणि युरोपियन युनियनचा एकत्रित बाजार सुमारे 2,091.6 लाख कोटी रुपये (सुमारे 24 ट्रिलियन डॉलर) इतका मोठा आहे. हा प्रचंड बाजार भारत आणि EU मधील सुमारे 2 अब्ज लोकांसाठी अभूतपूर्व संधी निर्माण करतो. हा मुक्त व्यापार करार केवळ व्यापारापुरता मर्यादित नसून नवोन्मेष, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्यासाठीही नवे दरवाजे उघडणारा आहे. या FTA मुळे भारताच्या 99 टक्क्यांहून अधिक निर्यातीला युरोपियन बाजारात अभूतपूर्व प्रवेश मिळणार आहे. त्याच वेळी संवेदनशील क्षेत्रांसाठी धोरणात्मक संरक्षणही राखण्यात आले असून, भारताच्या विकासात्मक प्राधान्यांना या करारातून बळ मिळणार आहे.
advertisement
भारत–EU एकूण व्यापार किती?
भारत आणि युरोपियन युनियनमधील द्विपक्षीय वस्तू व्यापारात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. 2024–25 या आर्थिक वर्षात हा व्यापार सुमारे 11.5 लाख कोटी रुपये (136.54 अब्ज डॉलर) इतका होता. यामध्ये भारताने EU कडे सुमारे 6.4 लाख कोटी रुपये (75.85 अब्ज डॉलर) इतकी निर्यात केली आहे.
सेवा क्षेत्रातील व्यापाराबाबत बोलायचे झाले, तर 2024 मध्ये भारत–EU सेवा व्यापार 7.2 लाख कोटी रुपये (83.10 अब्ज डॉलर) पर्यंत पोहोचला आहे. सध्याचा व्यापार मजबूत असला, तरी दोन्ही अर्थव्यवस्थांचा आकार आणि क्षमता पाहता अजूनही प्रचंड शक्यता शिल्लक आहेत. हा FTA भारत आणि EU यांना एकमेकांचे प्रमुख आर्थिक भागीदार बनवण्याचा अनोखा मार्ग ठरू शकतो.
advertisement
युरोपियन बाजारात भारताला किती प्रवेश?
या कराराअंतर्गत भारताला युरोपियन बाजारात 97 टक्के टॅरिफ लाईन्सवर प्राधान्य मिळणार आहे, ज्यामुळे 99.5 टक्के व्यापार मूल्य कव्हर होईल. विशेष म्हणजे 70.4 टक्के टॅरिफ लाईन्स ज्या भारताच्या 90.7 टक्के निर्यातीचे प्रतिनिधित्व करतात यांवर युरोपने शुल्क पूर्णपणे हटवले आहे.
कपडे, कापड, लेदर, पादत्राणे, चहा, कॉफी, मसाले, क्रीडा साहित्य, खेळणी, रत्न व दागिने तसेच काही सागरी उत्पादने अशा श्रमप्रधान क्षेत्रांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.
advertisement
याशिवाय, 20.3 टक्के टॅरिफ लाईन्स (भारताच्या 2.9 टक्के निर्यातीसाठी) पुढील 3 ते 5 वर्षांत शून्य केल्या जातील. काही पोल्ट्री उत्पादने, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा यांचा यात समावेश आहे. उर्वरित 6.1 टक्के टॅरिफ लाईन्ससाठी शुल्क सवलत किंवा टॅरिफ कोट्याच्या माध्यमातून प्राधान्य दिले जाईल.
श्रमप्रधान उद्योगांना मोठा दिलासा
भारताकडून युरोपकडे निर्यात होणारे कापड, परिधान, सागरी उत्पादने, लेदर, पादत्राणे, रसायने, प्लास्टिक/रबर, खेळणी, क्रीडा साहित्य, रत्न व दागिने अशा श्रमप्रधान क्षेत्रांचा वार्षिक निर्यात व्यवसाय 2.87 लाख कोटी रुपयांपेक्षा (33 अब्ज डॉलर) अधिक आहे. सध्या या उत्पादनांवर EU मध्ये 4 ते 26 टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लागते.
advertisement
FTA लागू होताच हे शुल्क शून्यावर येणार असून, यामुळे या क्षेत्रांसाठी युरोपियन बाजार पूर्णपणे खुला होईल. याचा थेट परिणाम रोजगारनिर्मिती, उत्पादनवाढ आणि भारताच्या जागतिक मूल्य साखळीतील सहभागावर होईल.
युरोपसाठी काय खास?
या करारांतर्गत भारताने आपल्या 92.1 टक्के टॅरिफ लाईन्स युरोपसाठी खुल्या केल्या आहेत, ज्यामुळे EU च्या 97.5 टक्के निर्यातीला फायदा होईल. यातील 49.6 टक्के टॅरिफ लाईन्सवर त्वरित शुल्क हटवले जाईल, तर उर्वरित 39.5 टक्के टॅरिफ लाईन्सवर 5, 7 किंवा 10 वर्षांत टप्प्याटप्प्याने शुल्क कमी केले जाईल.
advertisement
यामुळे युरोपमधील हाय-टेक उत्पादने भारतात अधिक प्रमाणात येतील, इनपुट खर्च कमी होईल आणि ग्राहकांनाही त्याचा फायदा मिळेल.
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर डील
या FTA मुळे भारतीय कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थ क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. चहा, कॉफी, मसाले, द्राक्षे, काकडी, सुकवलेला कांदा, ताजी फळे-भाज्या आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ यांना EU मध्ये प्राधान्य मिळेल. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि भारतीय कृषी उत्पादनांची जागतिक स्पर्धात्मकता वाढेल.
advertisement
डेअरी व संवेदनशील क्षेत्रांचे संरक्षण
डेअरी, धान्य, पोल्ट्री, सोयामील, काही फळे आणि भाज्या यांसारख्या संवेदनशील क्षेत्रांचे संरक्षण भारताने या करारात राखून ठेवले आहे. त्यामुळे देशांतर्गत प्राधान्ये जपत निर्यातवाढ साधता येणार आहे. उत्पादन-विशिष्ट नियम (PSR) असे आखण्यात आले आहेत की ‘मेक इन इंडिया’ला चालना मिळेल आणि MSME क्षेत्रालाही फायदा होईल.
निर्यातदारांसाठी सुलभता
या FTA अंतर्गत भारतीय निर्यातदारांना ‘सेल्फ सर्टिफिकेशन’द्वारे ‘स्टेटमेंट ऑन ओरिजिन’ देण्याची मुभा मिळणार आहे. त्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही कमी होतील. विशेषतः MSME निर्यातदारांसाठी हे मोठे पाऊल ठरणार आहे.
सेवा क्षेत्रासाठी सुवर्णसंधी
भारत आणि EU या दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये सेवा क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. या करारांतर्गत IT/ITES, प्रोफेशनल सेवा, शिक्षण, व्यापार सेवा अशा 144 सेवा उपक्षेत्रांमध्ये भारताला युरोपियन बाजारात प्रवेश मिळणार आहे. डिजिटल सेवा, गैर-भेदभावात्मक वागणूक आणि व्यावसायिकांच्या हालचालींना सुलभता यामुळे भारताच्या सेवा निर्यातीला मोठी चालना मिळेल.
युरोपमध्ये भारतीय प्रतिभेला वाव
FTA मुळे भारतीय व्यावसायिकांसाठी युरोपमध्ये तात्पुरत्या कामासाठी आणि वास्तव्यासाठी स्पष्ट चौकट तयार होणार आहे. बिझनेस व्हिजिटर्स, इंट्रा-कॉर्पोरेट ट्रान्सफरी, कराराधारित सेवा पुरवठादार आणि स्वतंत्र व्यावसायिकांना याचा फायदा होईल. यामुळे भारताची जागतिक प्रतिभा केंद्र म्हणून ओळख अधिक मजबूत होईल.
आयुष आणि पारंपरिक वैद्यकासाठी संधी
या करारामुळे आयुष आणि भारतीय पारंपरिक वैद्यक क्षेत्रालाही मोठी चालना मिळेल. ज्या EU देशांमध्ये नियमन नाही, तिथे आयुष तज्ज्ञांना भारतातील पात्रतेच्या आधारे काम करता येईल. युरोपमध्ये आयुष वेलनेस सेंटर्स आणि क्लिनिक्स उभारण्याचेही मार्ग खुले होतील.
एकूणच काय बदलणार?
या मुक्त व्यापार करारामुळे भारतीय शेती, उद्योग, MSME, सेवा क्षेत्र आणि निर्यातदारांना प्रचंड संधी मिळणार आहे. ग्रामीण उत्पन्न, महिला सहभाग आणि भारताची विश्वासार्ह जागतिक पुरवठादार म्हणून ओळख अधिक मजबूत होईल. एकूणच, भारत–EU FTA हा भारताच्या दीर्घकालीन आर्थिक वाढीसाठी आणि जागतिक प्रभाव वाढवण्यासाठी एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.
मालावरील टॅरिफ शून्य होणार असल्याने चॉकलेट्स, ऑलिव्ह ऑइल, बिस्किटे, ब्रेड, ज्वेलरी आणि लक्झरी कार्स स्वस्त होतील. उदाहरणार्थ: चॉकलेटवर 50% टॅरिफ शून्य. मशिनरी (44% टॅरिफ), केमिकल्स (22%) आणि फार्मा (11%) साहित्य स्वस्त मिळाल्याने उद्योग आणि ग्राहकांना फायदा. हे मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी रोजच्या खरेदी सुलभ करेल.
view comments
मराठी बातम्या/Explainer/
डीलमध्ये कोणाचा जास्त फायदा? ना भारत ना युरोपियन युनियन; सर्वात मोठा Profit तुम्हाला होणार, कसा ते समजून घ्या
Next Article
advertisement
Eknath Shinde: महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? एकनाथ शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेट बैठकीला दांडी, नेमकं कारण आलं समोर
महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेटला दांडी,
  • राज्याच्या राजकीय वर्तुळात महापालिका निवडणुकीनंतर मोठ्या घडामोडी सुरू आहेत.

  • आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहणा

  • मागील बैठकीतही एकनाथ शिंदे हे अनुपस्थित होते.

View All
advertisement