इथे माणुसकी संपली, हद्दच झाली! अंत्यसंस्काराची पावती देण्यासाठी लाच, छ. संभाजीनगरचा संतापजनक प्रकार
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये मड्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार घडला आहे. अंत्यंस्काराची पावती देण्यासाठी लाच घेताना दोघे सापडले.
छत्रपती संभाजीनगर : कोणीतरी घराचा आधार गेलेला असतो… कुटुंब अजूनही दु:खातून सावरत असतं. पण त्या वेळीही कागदासाठी लाच मागितली जाते, हे किती वेदनादायक आहे! अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली, जिथे मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराच्या पावतीसाठी 500 रुपयांची लाच घेताना दोन जणांना अटक करण्यात आली.
मनपाच्या झोन सहा कार्यालयात मड्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार घडला आहे. अंत्यसंस्काराच्या पावतीसारख्या मूलभूत कागदपत्रासाठी लाच मागणारे मनपाचे कंत्राटी कर्मचारी फिरोज जाफर खान (45, रा. रोजाबाग) आणि त्याच्यासाठी पैसे स्वीकारणारा झेरॉक्स सेंटर चालक शेख कड्डू इब्राहिम (53, रा. चिकलठाणा) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
advertisement
जून 2024 मध्ये तक्रारदाराच्या चुलत भावाचा अपघाती मृत्यू झाला होता. दुःख सावरतानाच कुटुंबाने अंत्यविधीची सर्व प्रक्रिया केली होती. मिळालेली पावती गहाळ झाल्याने मृताच्या पत्नीने पुन्हा प्रत घेण्यासाठी 1 नोव्हेंबरला झोन-6 कार्यालयात अर्ज केला. पण कागद देणं तर दूरच… उलट ‘पैसे द्या’ अशा अमानुष मागणीने त्यांना आणखी मानसिक त्रास सहन करावा लागला.
advertisement
संगणक ऑपरेटर फिरोज खानने पावती देण्यासाठी थेट 1 हजारांची मागणी केली. तीन दिवस कुटुंबाची अनावश्यक हेलपाटे, ताटकळ, आणि दुर्लक्ष जणू मृत्यू पुरेसा नव्हता म्हणून प्रशासनाकडून आणखी वेदना देण्याचा प्रयत्न सुरू होता. शेवटी त्रास सहन न झाल्याने मृताच्या भावाने 14 नोव्हेंबर रोजी अधीक्षक माधुरी कांगणे यांच्याकडे तक्रार दाखल केली.
पुढे निरीक्षक योगेश शिंदे व वाल्मीक कोरे यांनी तपास व खातरजमा केली. तपासात फिरोजने तक्रारदाराला ठरलेले 500 रुपये झेरॉक्स सेंटर चालकाकडे द्यायला सांगितल्याचे निष्पन्न झाले. संध्याकाळी तक्रारदाराने पैसे दिले, आणि स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शेख कड्डूला ताब्यात घेतले. त्यानंतर कार्यालयात बसलेल्या फिरोजलाही अटक करण्यात आली.
advertisement
“किमान 500 रुपये तर द्यावेच लागतात…”
view commentsपंचासमोरही फिरोजने 1 हजारांची मागणी केल्याचे सिद्ध झाले. तडजोडीअंती 500 रुपये तरी द्यावेच लागतील, अशी अट त्याने घातल्याचेही निष्पन्न झाले. खात्री होताच पथकाने सापळा रचला आणि कारवाई केली.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
November 15, 2025 9:08 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
इथे माणुसकी संपली, हद्दच झाली! अंत्यसंस्काराची पावती देण्यासाठी लाच, छ. संभाजीनगरचा संतापजनक प्रकार


