काँग्रेसच्या नाराज नेत्याला जलील यांच्याकडून थेट उमेदवारीची ऑफर, म्हणाले 'एवढाच राग असेल तर...'
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून काँग्रेसच्या नाराज नेत्याला लोकसभा उमेदवारीची ऑफर देण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर, सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यांचं मतदान देखील पार पडलं आहे. आता उर्वरीत जागांसाठी जोरदार प्रचार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र प्रचार सुरू असतानाच काही नेत्यांची नाराजी देखील समोर येत आहे. काँग्रेसचे नेते मोहम्मद आरीफ नसीम खान हे पक्षावर नाराज असल्याचं समोर आलं आहे. उमेदवारांचा प्रचार करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मोहम्मद आरीफ नसीम खान यांनी यासंदर्भात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना एक पत्रही लिहिलं आहे. त्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेत मनातील खदखद व्यक्त केली आहे.
दरम्यान नसीम खान यांच्या नाराजीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया देताना नसीम खान यांना थेट लोकसभेच्या उमेदवारीची ऑफर दिली आहे. नसीम खान हे नाराज आहेत असं मी ऐकलं आहे. त्यांनी राजीनामा दिला तर मला चांगलं वाटलं, मात्र त्यांनी केवळ पक्षाच्या स्टार प्रचारकाचा राजीनामा दिला आहे. एवढा राग असेल तर थेट पक्षाचा राजीनामा द्यायला हवा. मी तुम्हाला तिकीट द्यायला तयार आहे. आमचे मुंबईचे उमेदवार फिक्स झाले आहेत, मात्र तुम्ही म्हणाल त्या जागेवरून तुम्हाला तिकीट देऊ. नौटंकी करू नका, राजीनामा द्यायचा असेल तर पक्षाचा द्या, निवडणूक लढवा असं जलील यांनी म्हटलं आहे.
advertisement
नसीम खान नेमकं काय म्हणाले?
काँग्रेसने नसीम खान यांची स्टार कॅम्पेनर म्हणूनही नियुक्ती केली होती. मात्र प्रचार न करण्याच्या त्यांच्या निर्णयाने काँग्रेसला धक्का बसला आहे. राज्यात मविआकडून एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकिट दिलं नाही, मुस्लिम मते हवी पण उमेदवार का नको ? असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून विचारला जातोय. या प्रश्नाचं उत्तर मी जनतेला देऊ शकत नाही. त्यामुळे या निवडणुकीत मी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही असं नसीम खान यांनी म्हटलं आहे.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
April 27, 2024 1:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
काँग्रेसच्या नाराज नेत्याला जलील यांच्याकडून थेट उमेदवारीची ऑफर, म्हणाले 'एवढाच राग असेल तर...'


