Missing Link Project: घाट टळणार, वाहतूक कोंडीतून सुटका, पुणे-मुंबई प्रवासाचा अर्धा तास वाचणार, फडणवीसांकडून मिसिंग लिंकची पाहणी
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Missing Link Project: मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. या प्रकल्पातील एक बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा असून या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ अर्धा तासाने कमी होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या कामाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार बाळा भेगडे, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, सह व्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदल, राजेश पाटील मुख्य अभियंता राजेश निघोट, अधीक्षक अभियंता राहुल वसईकर उपस्थित होते.
advertisement
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई-पुणे हे अंतर कमी होणार असल्याने प्रवाशांना याचा फायदा होईल. महामार्गावरील घाटाचा भाग यामुळे टाळता येणार असून घाटमार्गामुळे होणारा वाहतूक अडथळा दूर होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर या महामार्गावर आरामदायी प्रवास होणार आहे.
या प्रकल्पांतर्गत एकूण तीन बोगदे असून एक बोगदा ९ किलोमीटर लांब व २३ मीटर रुंदचा असून देशातील सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरणार आहे. या अगोदर समृद्धी महामार्गावरील बोगद्याचा विक्रम या बोगद्यामुळे मागे पडेल. प्रकल्पांतर्गत अतिशय उंच पूल बांधण्यात येत असून याची उंची १८५ मीटर आहे. देशामध्ये आतापर्यंत एवढा उंच पूल कुठल्याही ठिकाणी बांधला गेला नाही. हा देखील एक विक्रम होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
advertisement
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच्यावतीने या प्रकल्पाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. या प्रकल्पाचे एकूण ९४ टक्के काम पूर्ण करण्यात आले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत प्रकल्पाचे काम करणारे अभियंते आणि कामगारांचे कौतुक केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 12, 2025 8:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Missing Link Project: घाट टळणार, वाहतूक कोंडीतून सुटका, पुणे-मुंबई प्रवासाचा अर्धा तास वाचणार, फडणवीसांकडून मिसिंग लिंकची पाहणी