कुलाबा विधानसभा निवडणूक 2024: राहुल नार्वेकरांविरोधात काँग्रेसने दिला मारवाडी उमेदवार; कुलाब्यात मराठी विरुद्ध अमराठी संघर्ष?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Colaba Assembly Election 2024: हाय प्रोफाइल मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा हा सामना दक्षिण मुंबईतील मराठी विरुद्ध अमराठी संघर्षाचं प्रतीक म्हणून लढला जाऊ शकतो.
मुंबई: मुंबई शहरात येणाऱ्या 10 विधानसभा मतदारसंघातील सगळ्यात दक्षिणेकडचा आणि उच्चभ्रू दक्षिण मुंबईचा भाग असणारा मतदारसंघ म्हणजे कुलाबा. कुलाबा विधानसभा मतदारसंघ गेली 10 वर्षं भाजपकडे आहे. विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांचा हा मतदारसंघ. महायुतीने यंदाही विद्यमान आमदार राहुल नार्वेकरांनाच तिकिट दिलं आहे. महाविकास आघाडीने काँग्रेसच्या हीरा देवासी यांना कुलाब्यातून उमेदवारी दिली आहे. दक्षिण मुंबईतील अमराठी व्यापारी समूहाची मतं मिळवण्यासाठी मारवाडी उमेदवार महाविकास आघाडीने उतरवला आहे. त्यामुळे हाय प्रोफाइल मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा हा सामना दक्षिण मुंबईतील मराठी विरुद्ध अमराठी संघर्षाचं प्रतीक म्हणून लढला जाऊ शकतो.
कुलाबा मतदारसंघ इतिहास
मुंबईमधील दक्षिण मुंबई हा बहुभाषिक लोकसभा मतदारसंघ आहे. याच मतदारसंघात कुलाबा विधानसभा मतदारसंघ उच्चभ्रू लोकांची, प्रामुख्याने उद्योजक आणि व्यापारी वस्ती असलेल्या कुलाबा, फोर्टचा परिसर इथे आहे. शिवाय मांडवी, धोबी तलाव, क्रॉफर्ड मार्केट परिसर आणि धोबी तलाव, फणसवाडी हा निम्न मध्यमवर्गीय लोकवस्तीचा भागही कुलाब्यात येतो.
कुलाब्यातून 2004 मध्ये काँग्रेसच्या अॅनी शेखर निवडून आल्या होत्या. मतदारसंघ पुनर्रचनेत 2008 साली कुलाबा मतदारसंघाच्या सीमा बदलल्या. तरीही 2009 ची निवडणूक काँग्रेसने जिंकली आणि अॅन्नी शेखर पुन्हा आमदार झाल्या. 2009 मध्ये त्यांनी भाजपच्या राज पुरोहित यांचा पराभव केला होता. हे राज पुरोहित नंतर 2014 मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आले. यंदाही कुलाब्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील होते. गेल्या निवडणुकीत त्यांना डावलून राहुल नार्वेकरांनाकुलाब्यातून उतरवण्यात आलं होतं. तेव्हापासून ते नाराज होते. यंदा त्यांनी बंडाचा पवित्राही घेतला होता. पण भाजप नेतृत्वाने त्यांना शांत करण्यात यश मिळवलं. उमेदवारी दाखल केल्यानंतर राहुल नार्वेकरांनी राज पुरोहित यांच्या समवेत पत्रकार परिषदही घेतली.
advertisement
भायखळा विधानसभा निवडणूक 2024: लोकसभेच्या पराभवातून सावरत यामिनी जाधव सावरणार का भायखळ्याचा गड?
गेल्या निवडणुकीत राहुल नार्वेकरांविरोधात काँग्रेसने भाई जगताप यांना उतरवलं होतं. पण नार्वेकरांनी त्यांचा 16195 मतांनी पराभव केला.
2019 विधानसभा निवडणुकीत कुलाबा मतदारसंघात काय झालं?
- राहुल नार्वेकर – भाजप – 57,420
- भाई जगताप – काँग्रेस – 41,225
- जितेंद्र कांबळे – वंचित - 3,011
advertisement
2024 लोकसभा निवडणुकीत काय झालं?
कुलाबा मतदारसंघ हा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघ चर्चेत होता कारण सेना विरुद्ध सेना अशी थेट लढत तिथे झाली. उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत निवडून आले आणि पुन्हा खासदार झाले. एकनाथ शिंदेंनी भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांना लोकसभेचं तिकिट दिलं होतं. पण अरविंद सावंतांनी त्यांच्यावर मात केली. शिवसेनेच्या यामिनी जाधव यांना सहापैकी केवळ दोन विधानसभा क्षेत्रांतून मताधिक्य मिळालं होतं. त्यापैकी एक होता राहुल नार्वेकरांचा कुलाबा. उबाठा गटाचे अरविंद सावंत यांना कुलाब्यातून 47684 मतं मिळाली, तर यामिनी जाधव यांना 56778 मतं मिळाली. 9094 चं लीड शिंदे शिवसेनेला मिळालं त्यामागे भाजपचे पारंपरिक मतदार होते. त्यामुळे महायुतीचे राहुल नार्वेकर यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
advertisement
दक्षिण मुंबईतील इतर विधानसभा मतदारसंघातील चित्र
- वरळी विधानसभा – आदित्य ठाकरे – शिवसेना (उबाठा)
- शिवडी विधानसभा – आमदार अजय चौधरी - शिवसेना (उबाठा)
- भायखळा विधानसभा - आमदार यामिनी जाधव - शिवसेना
- मलबार हिल विधानसभा – आमदार मंगलप्रभात लोढा - भाजप
- मुंबादेवी विधानसभा - आमदार अमीन पटेल - काँग्रेस
- कुलाबा विधानसभा - आमदार राहुल नार्वेकर – भाजप
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 08, 2024 8:42 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कुलाबा विधानसभा निवडणूक 2024: राहुल नार्वेकरांविरोधात काँग्रेसने दिला मारवाडी उमेदवार; कुलाब्यात मराठी विरुद्ध अमराठी संघर्ष?


