वाढदिवसानिमित्त 1 रोप! धाराशिवमध्ये आयुष्यभर झाडं जपण्याचा खास उपक्रम
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
Last Updated:
आतापर्यंत तब्बल 300 हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. वाढदिवसाचं औचित्य साधूनच हे वृक्षारोपण करण्यात येतं.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : शाळेत असताना आपण 'झाडे लावा, झाडे जगवा', हे घोषवाक्य शिकलो होतो. कदाचित तेव्हा ते आवडीनं जपायचोदेखील. मात्र पुढे कामाच्या व्यापात झाडं लावायला वेळच मिळाला नाही. फार कमी लोक असे असतात जे आजही वृक्षरोपण अगदी उत्साहानं करतात, तर काहीजण शुद्ध हवा मिळावी, घर सुंदर दिसावं यासाठी खिडकीत किंवा गॅलरीत काही झाडं लावतात. परंतु खरोखर सर्वांना शुद्ध हवा मिळावी, निसर्ग जपावं, या व्यापक उद्देशानं वृक्ष लागवड करणारे फार कमीजण असतात.
advertisement
धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील ईट इथं वृक्षसंवर्धन टीमकडून वृक्ष लागवडीसाठी अभिनव उपक्रम राबवण्यात येतोय. या टीमच्या वतीनं वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात येतं. सध्या ईट परिसरातील पांढरेवाडी रोड लगत हे वृक्षारोपण सुरू आहे, तर येत्या काळात संपूर्ण ईट गावाच्या परिसरात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे, वृक्ष लागवडीसाठी त्यांना सामाजिक वनीकरणाची मदतही मिळतेय.
advertisement
आतापर्यंत तब्बल 300 हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वाढदिवसाचं औचित्य साधूनच हे वृक्षारोपण करण्यात येतं. ज्या व्यक्तीच्या वाढदिवशी रोप लागवड केली, त्या व्यक्तीच्या पुढील वाढदिवशी त्या रोपाचाही वाढदिवस वृक्षसंवर्धन टीमकडून साजरा केला जातो.
advertisement
धाराशिव जिल्ह्यात वन क्षेत्राचं प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे या जिल्ह्यात वृक्षारोपण करण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी विविध उपक्रम हाती घेतले जातात. अनेक सामाजिक संस्थासुद्धा यासाठी पुढाकार घेतात. त्यातूनच वृक्षसंवर्धन टीमकडून हा अभिनव उपक्रम राबवण्यात येतोय. विविध सामाजिक संस्थांनी असा उपक्रम हाती घेतला तर निश्चितच येत्या काळात झाडांची संख्या वाढलेली पाहायला मिळेल.
advertisement
महत्त्वाचं म्हणजे वाढदिवस हा प्रत्येकासाठी अविस्मरणीय असतो. त्यामुळे वाढदिवसानिमित्त एखादं रोप जपण्याचा निश्चय केला तर कोणतीही व्यक्ती हे काम प्रामाणिकपणे करेल. हाच विचार करून वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करणं आणि आयुष्यभर त्या रोपाची जोपासना करण्याचा निर्णय वृक्षसंवर्धन टीमकडून घेण्यात आला. हा आदर्श खरोखर सर्वांनी घ्यायला हवा.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
June 27, 2024 8:19 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
वाढदिवसानिमित्त 1 रोप! धाराशिवमध्ये आयुष्यभर झाडं जपण्याचा खास उपक्रम