भाजपसोबत जागावाटपाची चर्चा फिस्कटली तर एकनाथ शिंदेंचा BMC निवडणुकीचा प्लॅन B तयार!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
महायुतीत जागावाटपाच्या चर्चेत शिंदे गटाच्या शिवसेनेने 125 जागांची मागणी केली आहे. मात्र भाजपकडून सुरुवातीला केवळ 50 ते 60 जागांची ऑफर देण्यात आल्याची माहिती आहे.
मयुरेश गणपत्ये, प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीकरिता भाजपशी जागावाटपासंदर्भात चर्चा सुरू असतानाही उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी ‘प्लॅन बी’ तयार ठेवला आहे. भाजपसोबत जागावाटपाच्या चर्चा सुरू असल्या, तरी गरज पडल्यास शिवसेना सर्व 227 वॉर्डमध्ये निवडणूक लढवण्याची तयारी शिंदे यांनी केली आहे.
महायुतीत जागावाटपाच्या चर्चेत शिंदे गटाच्या शिवसेनेने 125 जागांची मागणी केली आहे. मात्र भाजपकडून सुरुवातीला केवळ 50 ते 60 जागांची ऑफर देण्यात आल्याची माहिती आहे. तरीही दोन्ही पक्ष महायुती म्हणूनच बीएमसी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र चर्चा अपयशी ठरल्यास शिवसेना एकटी मैदानात उतरण्याची तयारी करत आहे.
याच तयारीचा भाग म्हणून मंगळवारी शिवसेनेने मुंबईतील सर्व 227 वॉर्डसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी सांगितले की, या मुलाखतींसाठी सुमारे अडीच हजारांहून अधिक इच्छुकांनी हजेरी लावली होती. अंतिम जागावाटप काहीही असो, प्रत्येक वॉर्डमध्ये सक्षम आणि जिंकण्याची ताकद असलेले उमेदवार शोधण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
“शिवसेना महायुतीतच निवडणूक लढवणार आहे. मात्र प्रत्येक वॉर्डसाठी सर्वोत्तम उमेदवार निवडणे हे आमचे ध्येय आहे. त्यामुळे सर्व वॉर्डासाठी मुलाखती घेण्यात आल्या. ही प्रक्रिया पारदर्शक राहावी यासाठी तीन निरीक्षकांची नेमणूकही करण्यात आली,” असेही शेवाळे यांनी सांगितले. इतर पक्षांच्या तुलनेत शिवसेनेच्या मुलाखतींना अधिक प्रतिसाद मिळाल्याचा दावाही शेवाळे यांनी केला.
पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, मुलाखतींना आलेल्या अनेक इच्छुकांचा याआधी राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि काँग्रेसशी संबंध होता. शिवसेना फुटल्यानंतर शिंदे गटासाठी ही पहिलीच मुंबई महापालिकेची निवडणूक असल्याने पक्षाची संघटनात्मक ताकद किती आहे, याचा अंदाज येईल.
advertisement
भाजपसोबत जागावाटपावर तोडगा निघेल, असा शिवसेनेला विश्वास आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी पक्षनेतृत्वाला कोणतीही जोखीम न घेता पूर्ण तयारी ठेवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. कुठल्याही कारणामुळे चर्चा फसल्यास शिवसेना सर्व 227 जागांवर निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असली पाहिजे, असे ठरल्याचे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 18, 2025 10:32 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपसोबत जागावाटपाची चर्चा फिस्कटली तर एकनाथ शिंदेंचा BMC निवडणुकीचा प्लॅन B तयार!











